breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महापौर, पक्षनेता, स्थायी सभापतींनी राजीनामा द्यावा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

  • लाचखोर अधिका-यांवर कारवाई करण्यास आयुक्तांची टाळाटाळ
  • महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर नाही वचक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन लाचखोर आधिका-यांवर कारवाईची मागणी करून देखील अद्याप कारवाई झाली नाही. महापौर, सत्तारुढ पक्षनेता आणि स्थायी समिती सभापती यांच्या मागणीला आयुक्तांनी अक्षरषः केराची टोपली दाखविली आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे लाचखोर अधिका-यांवर कारवाई न होणे हे या पदाधिका-यांचे मोठे अपयश आहे. त्यामुळे या तिघा पदाधिका-यांनी आपल्या पदांचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

यासंदर्भात वंचितचे पुणे शहर उपाध्यक्ष राजकुमार परदेशी यांनी प्रसिध्दीसाठी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, बायोमेडिकल इंजिनिअर सुनिल लोंढे व अभियंता सुनील बेळगावकर यांनी ठेकेदारांकडून बॅंक अकाउंटमध्ये कमिशनपोटी लाच घेतल्याचे प्रकरण गाजल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची बदनामी झाली. याप्रकरणी तीन लाचखोर अधिका-यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी सुरू असेपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. याला एक महिना कालावधी उलटून गेला तरी देखील अद्याप कारवाई करण्यात आली नाही.

आयुक्त हर्डीकर अशा लाचखोर अधिका-यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून महापौर ढोरे, पक्षनेते ढाके आणि स्थायी सभापती लोंढे यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे. या तीन पदाधिका-यांच्या मागणीला आयुक्त हर्डीकरांनी केराची टोपली दाखविली आहे. लाचखोर अधिका-यांना वाचविण्यासाठी आयुक्तांनी नैतिक पातळी सोडली आहे. त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले जात नसल्यामुळे याला सत्ताधारी भाजप पदाधिका-यांचे समर्थन असल्याचा संशय बळावला आहे. तरी, सत्ताधारी पक्षाच्या या तीन पदाधिका-यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी परदेशी यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button