breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत लाखो रुपयांचा मोबाईल घोटाळा; करदात्यांच्या पैशातून पदाधिका-यांनी ढापले मोबाईल

ब्लॅकबेरी, सॅमसंग कंपनीचे महागड्या मोबाईल, खुर्चीवर उतरताच मोबाईल केले नाहीत जमा

विकास शिंदे

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

श्रीमंत महापालिकेची बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिका-यांसह काही वरिष्ठ अधिका-यांनी देखील जनतेच्या कररुपी पैशातून खरेदी केलेले मोबाईल ढापले आहेत. गेल्या आठ वर्षात शंभरहून अधिक मोबाईल पदाधिकारी व अधिका-यांनी भांडार विभागाकडे जमा केले नाहीत. लाखो रुपयांचे खरेदी केलेले मोबाईलचा हिशोब भांडार विभागाला लागेना झाला आहे. त्यामुळे सुमारे 20 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत आता लाखो रुपयाचा मोबाईल खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. नगरसेवक पदासाठी कोट्यावधी रुपये खर्चून निवडून येणा-या लोकप्रतिनिधींनी महापालिकेचे घेतलेले मोबाईल अद्याप जमा केलेले नाहीत. जनतेच्या कररुपी पैशातून ह्या मोबाईलची खरेदी झालेली असून पदाधिका-यांनी त्यांच्या पदावरुन खाली उतरताच आपआपले मोबाईल जमा करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या आठ वर्षात शंभरहून अधिक पदाधिका-यांनी मोबाईल ढापले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापाैर, उपमहापाैर, सत्तारुढ पक्षनेता, स्थायी सभापती, विरोधी पक्षनेता, विधी सभापती, शहर सुधारणा सभापती, महिला व बालकल्याण सभापती, शिक्षण सभापती, जैवविविधता सभापती यांच्यासह आठ प्रभागांतील सर्व अध्यक्षांना महापालिकेकडून विविध सोयी-सुविधा देण्यात येतात. त्यात त्या पदाधिकां-याना मोबाईल देखील देण्यात येतो. मात्र, अनेकदा जूना वापरलेला मोबाईल कोणताही पदाधिकारी अथवा वरिष्ठ अधिकारी घेत नाही. त्यामुळे सर्वांना नवीच मोबाईल खरेदी करुन द्यावा लागतो. परंतू, त्या पदाचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर मोबाईल संच जमा करुन घेण्याची जबाबदारी त्या-त्या विभागची आहे. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. अनेक पदाधिका-यांनी खरेदी केलेले मोबाईल पुन्हा भांडार विभागाकडे जमा न केल्याने लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे.

महापालिकेच्या भांडार विभागाने सन 2012 पासून आजपर्यंत साधारणपणे 30 लाख 38 हजार 480 रुपयांचे 155 मोबाईल खरेदी केलेले आहेत. हे मोबाईल ब्लॅकबेरी, सॅमसंग या कंपन्याचे आहेत. त्यातील भांडार विभागाकडे अद्याप 54 मोबाईल जमा केलेले आहेत. त्यामुळे 101 मोबाईल अजूनही भांडार विभागाकडे जमा न केल्यामुळे सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज पदाधिकारी व वरिष्ठ अधिका-यांनी ढापल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मोबाईल संच ढापलेल्या पदाधिका-यांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि विद्यमान भाजपच्या पदाधिका-यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button