breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेऊन संशयपिशाच्च दूर करा! – उद्धव ठाकरे

  • उद्धव ठाकरेंचे भाजपाला आव्हान 

मुंबई – ईव्हीएमचे हे गूढ काही उकलत नाही. त्यामुळे विरोधकांची तोंडे एकदाची बंद करण्यासाठी भाजपाने देशातील निवडणुका एकदा मतपत्रिकेद्वारे घेऊन दाखवत याबाबतचे संशयपिशाच्च दूर करून टाकावे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी दिले आहे.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर ते “शिवसेना भवन’ येथे पत्रकारांशी बोलत होते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाची घोडदौड दिसते. पोटनिवडणुका मात्र भाजपा हरते. वातावरण वेगळे असते, निवडणुकांचे अंदाज देखील वेगळे असतात. पण निवडणुकांचे निकाल मात्र वेगळेच असतात, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौरे सोडून कर्नाटकमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून बसले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील चांगली मेहनत घेतली, याबद्दल दोघांचेही त्यांनी अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाची घोडदौड असते. पोटनिवडणुकांमध्ये मात्र त्यांचा पराभव होतो. उत्तरप्रदेशमधील पोटनिवडणुकीत त्यांना त्यांच्या पारंपारिक जागा गमवाव्या लागल्या आहेत. हे ईव्हीएमचे गूढ काही उकलत नाही. त्यामुळे भाजपाला जर स्वतःवर विश्वास असेल तर देशात बॅलटपेपरवर म्हणजे मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेऊन दाखव्याव्यात व विरोधकांची तोंडे बंद करून टाकावीत.

सीमाभागातील मराठी जनतेच्या भावनांचा आदर करावा 
प्रत्येक पक्षाला जनता कौल देत असते. त्यानुसार त्या पक्षाच्या नेत्याला नेतेपदाचा अधिकार मिळत असतो असे उत्तर त्यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदावरील दाव्याबाबत दिले. ज्या राज्यांमध्ये भाजपाची राजवट नव्हती तिथे त्यांना यश मिळाले. मात्र ज्या राज्यातील जनतेला भाजपाच्या राजवटीचा अनुभव आहे त्यांचे मत वेगळे असू शकते असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये सरकार कोणाचेही येवो. मात्र, ज्या पक्षाचे सरकार येईल त्यांनी सीमाभागातील मराठी जनतेच्या भावनांचा आदर करावा अशी अपेक्षाही उदधव ठाकरे यांनी यावेळी व्यक्‍त केली.

वनगा परिवाराला न्याय देण्यासाठीच लढतोय 
भाजपाचे दिवंगत खासदार अँड. चिंतामणराव वनगांनी 30 वर्षे एका पक्षासाठी जीवाचे रान केले, त्यांच्या परिवाराची अवहेलना झाली, म्हणूनच उद्वेगाने वनगा परिवार शिवसेनेत आला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच शिवसेना पालघरची पोटनिवडणूक लढत आहे. पालघरमध्ये शिवसेनाच विजयी होणार असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button