breaking-newsमहाराष्ट्र

मंदिर-मशिदीचा मुद्दा घेऊन भाजपचा मते घेण्याचा प्रयत्न

  • खासदार अशोक चव्हाण यांचा आरोप

कराड – आरएसएसकडून मतदार याद्यांमध्ये नावे घाला व काढा याचे मोठे काम सुरू आहे. मंदिर-मशिदीचा मुद्दा घेऊन भाजपचा मतपेटी भरण्याचा प्रयत्न राहणार आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे सूत्र असलेल्या सौदेबाज राज्यकर्त्यांकडून देशाची मूळ व्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

काँग्रेसच्या संघर्ष यात्रेचे रविवारी रात्री सातारा जिल्ह्यत आगमन झाले. या वेळी कराड येथे जाहीर सभेत ते बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देशाची लोकशाही धोक्यात असल्याची चिंता व्यक्त करतात. ही बाब सामान्य नाही. राज्यकर्त्यांनी देशाच्या अस्मितेचा खेळ मांडला असून, इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी संविधान जाळण्याचा प्रकार केला. देशाची ही वाटचाल अशीच राहिली तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रासाठीचे योगदान व्यर्थ होणार आहे. मात्र, काँग्रेस गप्प बसणार नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आमचा लढा कायम राहणार आहे. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी हरल्या आणि त्यानंतर जिंकल्याही. कारण, काँग्रेसचा लढा हा विचारांचा लढा असल्याचे ते म्हणाले.

महिलांवरील अत्याचार वाढल्याने भाजपपासून बेटी बचाओ म्हणण्याची वेळ आली आहे. धनगर, मराठा आरक्षणप्रश्नी सरकार घूमजाव करीत असून, पंढरीचा पांडुरंगही मुख्यमंत्र्यांना दर्शन द्यायला तयार नाही. ‘अच्छे दिन’ची घोषणा जनतेबरोबरच आता भाजपही विसरून गेले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर कोणता धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करणार याची लोकांना भीती वाटत आहे. मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचा फसव्या घोषणांचा कारखानाच असल्याची टीकाही अशोकरावांनी केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की नोटबंदी जगातील सर्वात मूर्खपणाचा निर्णय असून, हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्लाच आहे. मोदींची सर्व आश्वासने बोगस असून, त्यामुळे लोकांमध्ये मोठा आक्रोश, संतापाची भावना आहे. तरीही, नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आलेच तर हा हुकूमशहा पुढे निवडणुकाही नाहीत, लोकशाही नाही, आंबेडकरांनी दिलेले संविधानही नाही अशी अवस्था करून ठेवेल, अशी टीका पृथ्वीराजांनी केली. सध्याचे निधर्मवाद्यांचे गठबंधन अधिक घट्ट होत गेल्यास केंद्रात मोदी सत्तेवर राहणार नाहीत. सर्व राज्यांमध्ये भाजपची पीछेहाट होईल असा दावा त्यांनी केला. सनातन संस्थेला कोणीतरी राजाश्रय देतयं ही बाब गंभीर आहे. पुरोगामी विचारावंतांच्या हत्या होत असून, बॉम्ब बनवणारी फॅक्टरीच सापडत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमुक्त भारत करण्यासाठी काँग्रेसची ही संघर्ष यात्रा सुरू असल्याचे सांगितले. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांची नजरबंदीसारखी झालेली अवस्था महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी असून, जातीयवादामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. भाजपची लोकप्रियता शिखरावर आहे,तर त्यांनी बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊनच दाखवाव्यात, असे आपले आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.  काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्ष चारूलता टोकस, सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, शरद रणपिसे, सचिन सावंत यांनीही आपल्या भाषणात भाजपवर टीकेची झोड उठवली. प्रास्ताविक आमदार आनंदराव पाटील यांनी केले. आमदार जयकुमार गोरे, सत्यजित देशमुख, मनोहर शिंदे आदींची उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button