breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मंत्री गिरीश महाजनांचा दौरा निष्फळ, मुख्यमंत्र्यांचा सांगावा नव्हे, बैठकीचा घेतला पूर्वआढावा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन शहरात आल्याचे विधान साफ खोटे ठरले आहे. महाजन हे दोघांमध्ये समेट घडविण्यासाठी नव्हे, तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरीत आज होणा-या नियोजित बैठकीचा आढावा घेण्यासाठी आले होते. “दोघांमधील अंतर्गत वादावर मी बोलणार नाही”, असे एका जगताप समर्थकाजवळ बोलून महाजन निघून गेल्याने त्यांचा हा दौरा निष्फळ ठरला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात बारणे-जगताप वादाबाबत अनभिज्ञ आहे, असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. एवढा खालच्या पातळीला वाद गेल्याने दोघांची नावे शहरातच नव्हे तर राज्यभरात गाजलेली आहेत. लोकसभा निवडणुकीत मावळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तो भाजपकडे ठेवून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अटोकाट प्रयत्न केले. पन्नास नगरसेवकांनी जगतापांना मावळ मतदार संघातून भाजपची उमेदवारी द्यावी, अन्यथा युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पराभवाचे खापर आमच्या माथ्यावर फोडू नये, असा इशारा स्थानिक भाजप नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. मात्र, आरएसएस आणि भाजपच्या गोटात काहीही होऊ शकते.

  • शेवटी जगतापांना बाजुला सारून त्यांचे कट्टर विरोधक बारणे यांना युतीची उमेदवारी दिली. त्यावर जगताप समर्थकांनी भाजप श्रेष्ठींवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. स्वतःला निष्ठावंत म्हणणा-या मुठभर कार्यकर्त्यांनी सुध्दा निष्ठा बाजुला ठेवून भाजपवर आरोप केले होते.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी बारणे यांना निवडून देण्याचा प्रचार सुरू आहे. असेही जगताप समर्थक आपला प्रचार करणार नाहीत, हे बारणे यांना ज्ञात आहे. त्यामुळे वरूनच मोदींच्या नावाचा शंकनाद केला की, खालच्या फळीपर्यंतच्या कार्यकर्त्याला आपोआप निष्ठा दाखवावी लागते, असे बारणे यांना वाटत असावे. परंतु, जगताप मुरब्बी राजकारणी आहेत. शरद पवार यांच्या ताफ्यात त्यांनी राजकीय डावपेच गिरवले आहेत. उद्या बारणे यांच्या पराभवाचे खापर ते स्वतःच्या माथ्यावर कदापी फोडून घेणार नाहीत. हे बारणे यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे, अशी सूचना काही जाणकारांनी केली आहे.

  • बारणे आणि जगताप यांच्यातील वाद सर्वश्रृत असताना दोघांमध्ये समेट घडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना जगतापांची समजूत काढण्यासाठी पाठविल्याचा कांगावा करण्यात आला. महाजनांनी दोघांमध्ये समेट घडवून आणल्याच्याही आफवा पसरविण्यात आल्या. प्रत्यक्षात महाजन हे दोघांमध्ये निर्माण झालेली राजकीय दरी मिटविण्यासाठी आले नव्हते. तर, ते आज पिंपरी-चिंचवडमध्ये होणा-या मुख्यमंत्र्यांच्या नियोजित बैठकीचा पूर्व आढावा घेण्यासाठी आले होते.

महाजन बैठकीसंदर्भात जगताप यांच्याशी चर्चा करून निघून गेले. जाताजाता दोघांमधील अंतर्गत वादावर मी काय बोलणार, असा प्रश्न एका कार्यकर्त्याजवळ ते टाकून गेले. त्यामुळे बारणे आणि जगताप यांची दिलजमाई न होता महाजनांचा दौरा निष्फळ ठरला आहे. त्यातीलच काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांची आज शहरातील नियोजित बैठक भाजपला रद्द करावी लागली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button