breaking-newsमहाराष्ट्र

‘भुजबळांसारख्यांचा भाजपा प्रवेशाचा दरवाजा मुख्यमंत्र्यांनी दाणकन बंद केला’

छगन भुजबळांसारख्यांचा भाजपा प्रवेशाचा दरवाजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाणकन बंद केला असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ईडी वगैरेची चौकशी सुरु आहे अशांना भाजपात प्रवेश नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्याच वक्तव्याचा आधार घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्धवस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपाच्या पक्क्या घरात प्रवेश करत आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

भाजपामध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच अनुषंगाने भाजपाचे कौतुक करत आणि विरोधकांना टोले लगावत सामनाच्या अग्रलेखातून भूमिका मांडण्यात आली आहे. राजकारणात काही गोष्टी अपरिहार्य ठरतात. मात्र रंगुनी रंगात साराऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा असे अनेकदा वागावे लागते असेही उदाहरण सामनाच्या अग्रलेखात देण्यात आले आहे. भाजपा हा एक तत्त्व, नीतीमत्ता आणि पारदर्शक विचारांचा पक्ष आहे. भाजपा संघाला आणि संघटनेला महत्त्व देणारा पक्ष आहे असेही अग्रलेखात म्हटले गेले आहे.

काय आहे अग्रलेखात?

राष्ट्रवादीचे तालेवार नेते मधुकर पिचड, त्यांचे आमदार पुत्र वैभव पिचड, सातारचे राजे शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक, मुंबईचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ व इतर बरेच लोक भाजपमध्ये आले. हा प्रवेश सोहळा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ची खरी सुरुवात आहे. हे चित्र तसे गमतीचे आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणे आमदार कोळंबकरांचे डोळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आठवणीने पाणावले व त्यांना टी.व्ही. कॅमेऱयासमोरच हुंदके फुटले. कोळंबकर हे शिवसेनेत आमदार व मंत्री होते. ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले व आता भाजपवासी झाले. शिवसेना सोडून मोठा कालखंड लोटला आहे. कोळंबकर विधानसभेची जी जागा लढवत आहेत ती ‘युती’मध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. त्यांना शिवसेनाप्रमुखांविषयी इतकाच जिव्हाळा होता तर त्यांनी शिवसेनेची वाट धरायला हवी होती. त्यामुळे त्यांचे अश्रू कुणालाही विचलित करू शकत नाहीत.

भ्रष्टाचार व लाचलुचपतीचे आरोप मागे घेऊ व त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करू, अशी घोषणा सरकारने केल्याचे आम्ही तरी वाचलेले किंवा ऐकलेले नाही. पिचड यांनी तर स्पष्ट सांगितले की, ‘देश ज्या बाजूला आहे, महाराष्ट्र ज्या बाजूला आहे, त्या बाजूला गेले पाहिजे हा आमचा मार्ग आहे.’ राधाकृष्ण विखे पाटील यांनीच हा मार्ग दाखवल्याचे गुपितही पिचडांनी फोडले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, भाजप म्हणजे धर्मशाळा नाही. भाजप हा एक तत्त्व, नीतिमत्ता, पारदर्शक विचारांचा पक्ष आहे. भाजप संघाला आणि संघटनेला महत्त्व देतो. राजकारणात काही गोष्टी अपरिहार्य ठरतात, पण ‘रंगुनी रंगात साऱया रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱया पाय माझा मोकळा’ असे अनेकदा वागावे लागते. फडणवीस यांनी सर्व गुंते सोडवून स्वतःला मोकळे ठेवले. ‘ईडी’ वगैरेंची चौकशी चालू असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही, असे सांगून त्यांनी भुजबळांसारख्यांचा भाजप प्रवेशाचा दरवाजा दाणकन बंद केला. राजकारणात नीतिमत्ता शिल्लक आहे. मुख्यमंत्र्यांची त्यासाठी धडपड सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button