breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भारत एकात्म ठेवायचा असेल तर जातीवादी प्रवृत्ती नष्ट करणे गरजेचे – डॉ. श्रीपाल सबनीस

अनिता सावळे यांना भीमा-कोरेगाव विजयस्तंभ शौर्य पुरस्कार प्रदान

पुणे | प्रतिनिधी

कोरेभाव भीमाचे राष्ट्रीय स्मारक हे शौर्याचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. तेथे ब्राह्मणशाही नसते, वर्णव्यवस्था नसते. जाती-व्यवस्थेमुळे पेशव्यांचे राज्य गेले. सध्याची जागतिक परिस्थिती बघता अंतर्गत जात-धर्म व्यवस्था स्फोटक करून भांडणे योग्य नाही. भारत एकात्म ठेवायचा असेल तर जातीयवाद नष्ट झाला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी पहिली तक्रार दाखल करणार्‍या अनिता सावळे यांना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे आज (दि. 31 डिसेंबर 2020) भीमा-कोरेगाव विजयस्तंभ शौर्य पुरस्कार सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर होते. स्मृतीचिन्ह, तिरंगी शाल, संविधान ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्थायी समिती सदस्या लता राजगुरू, कष्टकर्‍यांचे नेते बाबा कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, रमेश सकट, शिलारतन गिरी विचारमंचावर होते.

सबनीस म्हणाले की, जातीयवाद पेरणारे एकात्मतेला सुरूंग लावतात. पेशव्यांच्या काळात ब्राह्मणशाही नसती तर दुखावलेला समाज इंग्रजांना सामिल झाला नसता. इंग्रजांना भारतावर 150 वर्षे राज्य करता आले नसते. आगरकर, रानडे, महात्मा फुले क्रांतिकारक ठरले नसते. समतेचे, न्यायव्यवस्थेचे पुरस्कर्ते ठरले नसते. भारताचे खरे शत्रू चीन आणि पाकिस्तान आहेत. चीनचा विस्तारवाद संपूर्ण जगाला धोक्याचा आहे. अशा परिस्थितीत एकसंघ भारत घडविणे महत्त्वाचे आहे. ज्या योगे आपण बलाढ्य शत्रूलाही नमवू शकू. राजकारणातही जातीय संघर्ष संपला पाहिजे, एकात्मतेचे राजकारण दिसले पाहिजे. भारतात जो पर्यंत माणसाच्या भाकरीचा प्रश्न संपत नाही, तो पर्यंत देश महासत्ताक बनणार नाही. सध्याचे राजकारण सत्ताकेंद्री आहे. त्यामुळे भविष्यात गुन्हेगारीचे समाजकारण, राजकारण घडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या शेतकरी आंदोलनाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशच भयभीत झाला असल्याचे मत त्यांनी नोंदविले. राजकारण्यांनी सर्व प्रवाहातील सत्यनिष्ठ महापुरूष एकत्र आणून विवेकी राजकारण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना अनिता सावळे म्हणाल्या, पुरस्कारामुळे पुढील लढाई लढण्यास बळ मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीतून प्रत्यक्षात आणले जात असल्याबद्दल माझ्या कार्याला पाठबळ मिळणार आहे. समाजात स्त्रियांचे स्थान समान-महान असावे, हे फक्त विचारातून नाही तर पुरस्कार प्रदानाच्या कृतीतून दाखवून दिले गेले आहे, याचे समाधान वाटते.

बाबा कांबळे यांनी अनिता सावळे यांच्या कार्याचा गौरव केला.

अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. प्रमोद आडकर म्हणाले, स्त्रीयांचे कर्तृत्व-शारीरिक-मानसिक क्षमता ही पुरुषांपेक्षाही जास्त आहे हे लक्षात घेऊन स्त्रीयांचा कायम आदर ठेवावा. आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी महिला त्याला मोठ्या धैर्याने तोंड देतात.

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविकात पुरस्कार वितरणामागील उद्देश सांगितला. आभार लता राजगुरू यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button