breaking-newsराष्ट्रिय

भाजप आमदारासह दहा जणांवर खुनाचा गुन्हा

उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीच्या वाहनाला रविवारी झालेल्या अपघातप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेनगर याच्यासह दहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून, भाजपची कोंडी झाली आहे.

भाजप आमदार कुलदीप सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणीच्या कारला रविवारी अपघात झाला. ट्रकने कारला दिलेल्या धडकेत तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून, तिच्यासह वकील गंभीर जखमी झाले. हा घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.  या अपघातप्रकरणी रायबरेलीतील गुरुबक्षगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुलदीप सेनगर यांच्यासह दहा जणांवर खून, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुरक्षेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. पीडितेच्या निवासस्थानी सात पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यातील तिघे रविवारी पीडितेच्या वाहनातून जाण्यास तयार होते. मात्र, वाहनात जागा नसल्याने पीडित तरुणीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत घेतले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

हा ट्रक रायबरेली येथून फतेहपूरकडे जात असताना अपघात झाला. चालक, क्लीनर व मालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासण्यात आले होते. मात्र, ट्रक कर्जावर घेतलेला असून, हप्ते भरलेले नसल्याने नंबर प्लेटला काळे फासलेले होते, असा दावा ट्रक मालकाने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीबीआय चौकशीची तयारी

पीडित तरुणीच्या वाहनाला ट्रकने धडक दिली आहे. हा अपघातच असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू असून, पीडितेच्या आईने किंवा तिच्या नातेवाईकांनी विनंती केल्यास सीबीआय चौकशीची शिफारस करण्याची तयारी आहे, असे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले.

सप, काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

पीडित तरुणीला ठार करण्याचा डाव होता, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला. राज्यात जंगलराज सुरू असून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही अखिलेश यांनी केली. काँग्रेसनेही या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. पीडित तरुणीच्या सुरक्षेत त्रुटी ठेवण्यात आल्या. साक्षीदारांना संरक्षण का देण्यात आले नाही, असे सवाल काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी -वढेरा यांनी केले आहेत.

सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून आमदारसमर्थकांना माहिती..

पीडित तरुणीच्या सुरक्षेसाठी उन्नावमधील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांनीच पीडितेचे कुटुंबीय रायबरेलीमध्ये जात असल्याची माहिती आमदाराच्या समर्थकांना दिल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे. आमदार सेनगर याच्या समर्थकांनी पीडितेच्या कुटुंबियांना फोन करून जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याचाही आरोप आहे.

संसदेत पडसाद

पीडित तरुणीला झालेल्या अपघात प्रकरणाचे संसदेत आणि संसदेबाहेर तीव्र पडसाद उमटले. राज्यसभेत विरोधी पक्षांनी केलेल्या निदर्शनानंतर सभागृह तहकूब करण्यात आले. दिल्लीत ‘इंडिया गेट’वर भाजप आमदाराविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button