breaking-newsराष्ट्रिय

भाजपाला काँग्रेसपेक्षा १५ पट अधिक देणगी, २०१७-१८ मध्ये मिळाले ४०० कोटी

निवडणूक आयोगाला सोपवलेल्या अहवालात भाजपाने २०१७-१८ मध्ये त्यांना ४०० कोटींहून अधिक देणगी मिळाल्याचे म्हटले आहे. ही रक्कम मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या सुमारे १५ पट अधिक आहे. राजकीय पक्षांच्या ‘कॉन्ट्रिब्यूशन अहवालात’ ही बाब समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला या कालावधीत फक्त २६ कोटी रुपये गोळा करता आले. दोन्ही पक्षांच्या वार्षिक हिशेब खात्यात ही रक्कम आणखी वाढू शकते.

‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार संपूर्ण लेखापरिक्षणात ही रक्कम १ हजार कोटी रुपयांच्या नजीक पोहोचेल. भाजपा आणि काँग्रेस दोघांनी आतापर्यंत २०१७-१८ च्या वार्षिक लेखापरीक्षण, प्राप्तिकर परतावा आणि ताळेबंद दाखल केलेला नाही.

राजकीय पक्षांनी आतापर्यंत इलेक्ट्रोरल आधारित निधीचीही माहिती दिलेली नाही. काँग्रेस आणि भाजपाच्या वार्षिक लेखापरीक्षण खात्यात याची माहिती दिली जाऊ शकते. या माध्यमातून भाजपाने अधिक निधी मिळवल्याचे बोलले जाते. त्यांना प्रूडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्टकडून १४४ कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. त्यांनी २०१७-१८ मध्ये सुमारे १६९ कोटी रुपये मिळवले होते. काँग्रेसला १ कोटी देणारे आदित्य बिर्ला जनरल इलेक्ट्रोरल ट्रस्टने भाजपाला १२ कोटींहून अधिक निधी दिला आहे. मुरुगप्पा समूहाच्या इलेक्ट्रोरल ट्रस्टने भाजपा आणि काँग्रेसला १-१ कोटी रुपये दिले आहेत.

इलेक्ट्रोरल ट्रस्टशिवाय कॅडिला हेल्थकेअर (१३ कोटींहून अधिक), मायक्रो लॅब्ज प्रा. लि. आणि यूएसव्ही लि. (प्रत्येक ९-९ कोटी), सिप्ला (९ कोटी) आणि अलेंबिक फार्मास्युटिकल्स आणि महावीर मेडिकेट (६ कोटी) हे भाजपाचे मोठे देणगीदार आहेत. लोढा (६.५ कोटी), जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स (५ कोटी) आणि रेअर इंटरप्रायजेस (९ कोटी) यांनी भाजपाला निधी दिला आहे.

२०१४ मध्ये जेव्हा भाजपा सत्तेवर आल्यापासून पक्षाच्या निधीत वाढ झाली. २०१३-१४ मध्ये हा निधी ६७३.८१ कोटीवरुन ५३ टक्क्यांनी वाढून २०१६-२०१७ मध्ये १०३४.२७ कोटी रुपये झाला. याच कालावधीत काँग्रेसची कमाई ५९८.०६ कोटींवरुन ६२ टक्क्यांनी घसरुन २२५.३६ कोटी झाली. साधारणपणे सत्ताधारी पक्ष दुसऱ्या पक्षांपेक्षा जास्त निधी मिळवतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button