breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार; उमेदवारी कोणाला? भेगडे की जगतापांना?

  • मावळ कार्यकर्ता आढावा बैठकीत घोषणा
  • मदनलाल धिंग्रा मैदानावर विराट सभेचे आयोजन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने ठेवली असून मावळ लोकसभा मतदार संघात प्रचाराचा नारळ 3 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फोडला जाणार आहे. मात्र, शिवसेनेचा गड असलेल्या मावळ मतदार संघात भाजपचे संभाव्य उमेदवार कोण असणार याबाबत मात्र भाजप नेत्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. संभाव्य उमेदवार आमदार बाळा भेगडे आणि आमदार लक्ष्मण जगताप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे अजून गुलदस्त्यात आहे. तथापि, प्रचाराचा नारळ फोडण्याची नेत्यांनी तयारी केल्यामुळे मावळ आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात अडकले आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघावर गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचे वर्चस्व अबाधित आहे. हा मतदार संघ शिवसेनेचा अभेद्य गड मानला जातो. माजी खासदार गजानन बाबर यांनी दोनवेळा खासदारकी लढविली असून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेच्याच तिकीटावर गड यशस्वीपणे शाबूत ठेवला आहे. मात्र, युती करण्यासाठी शिवसेना जुमानत नसल्यामुळे भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्याअनुषंगाने मावळ लोकसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांची आढावा बैठक आजच शुक्रवारी (दि. 26) वाल्हेकरवाडीत पार पडली. बैठकीत मावळ लोकसभेतून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे संभाव्य उमेदवार पक्षाचे आमदार बाळा भेगडे आणि लक्ष्मण जगताप दोघेही उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मतदार संघातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. मात्र, भाजपचा संभाव्य उमेदवार कोण असणार, याबाबतचे संकेत त्यांच्याकडून मिळाले नाहीत.

मावळ विधानसभा मतदार संघातून बाळा भेगडे भाजपच्या तिकीटावर सलग तीनदा आमदार झाले आहेत. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुध्दा अपक्ष, राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लडवून आमदारकीची हॅट्रीक साधली आहे. भेगडे आणि जगताप दोघेही मावळ लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांपैकी एकाचे नाव भाजपला उमेदवार म्हणून जाहीर करावे लागणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला लागता येते. तथापि, मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराचा नारळ 3 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फोडण्यात येणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. शहरातल्या मदनलाल धिंग्रा मैदानात लोकसभेच्या प्रचारार्थ विराट सभा घेण्याचे नियोजन केले असल्याचे स्वतः दानवे यांनी बैठकीत जाहीर केले. भाजपच्या उमेदवारीसाठी भेगडे आणि जगताप यांच्यात रस्सीखेच होणार आहे. दोघांपैकी कोणाला तिकीट मिळते, हे पाहण्याची उत्सुकला शिगेला पोहोचली आहे.

दिवाळीनंतर 48 लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार

पिंपरी-चिंचवडमधील मदनलाल धिंग्रा मैदानात ३ नोव्हेंबर रोजी भाजपाच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला एक लाखाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन केले आहे. दिवाळीनंतर राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहोत. त्यानंतर राज्यभर सभा घेतल्या जातील. शिवसेनेसोबत युतीसंदर्भात अद्याप बैठक झालेली नाही. परंतू, समविचारी पक्षांना सोबत घेऊनच भाजपा निवडणूकीला सामोरे जाईल. मतांचे विभाजन आम्ही होऊ देणार नाही. शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. परंतू कोण कोणासोबत जातेय, हे आम्हाला महत्वाचं नाही. ते एकत्र आल्यास भाजपाला काहीच फरक पडणार नाही. केंद्रात आणि राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button