breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राणा पाटलांसाठी भाजपकडून देवानंद रोचकरींचा ‘बळी’, पाटलांना निवडणूक जढ जाणार!

  • देवानंद भाऊंवर पाटलांच्या विजयाची भिस्त कायम
  • नाराजांची मोट बांधण्याचे निर्माण झाले आव्हान

तुळजापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी

तुळजापूर विधानसभा मतदार संघातून भाजपने उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राणा पाटील आणि तुळजापूरचे तीनवेळा आमदार राहिलेले मधुकरराव चव्हाण यांच्यात जोरदार लढत होणार आहे. या दोन विद्यमान आमदारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. त्यांना वंचित व तगड्या अपक्ष उमेदवारांचे आव्हान पेलावे लागणार आहे.    

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना राणा जगजीतसिंह यांचा उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून विजय झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून राणा पाटलांचा पराभव झाला. आता राज्यभरात राष्ट्रवादीला लागलेली गळती पाहता भाजपला आव्हान देणा-या भल्याभल्या नेत्यांवर पक्ष सोडून जाण्याची वेळ आली आहे. शेवटी राणा पाटील हे सुध्दा या सापळ्यातून बाहेर पडू शकले नाहीत. त्यांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी असलेले कौटुंबिक नाते तोडून भाजपत जावे लागले. आता विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, उस्मानाबाद मतदार संघ शिवसेनेला सुटल्याने राणा पाटलांना तुळजापूर मतदार संघातून निवडणुकीत उतरविले आहे. तुळजापूरचा मतदार राणा पाटलांचा कितपत स्वीकार करतील हे सांगणे दुरापास्त आहे.

राणा पाटलांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जाम भडकले होते. पक्षाने सर्वकाही देऊन सुध्दा हा माणूस भाजपच्या वळचणीला गेल्याने तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पवार साहेबांचा चाहता वर्ग राणा पाटलांवर दात खावून आहे. त्यातच राणा पाटलांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे आता नेमके निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच, राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा असलेले उद्योजक अशोक जगदाळे हे देखील तयारीत आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी देखील गावभेट दोरे, शिबिरे घेऊन लोकांशी संपर्क वाढविला आहे. त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल याची खात्री होती. परंतु, पक्षाने त्यांना डावलल्याने त्यांचा गट नाराज झाला आहे. त्यांनी जर बंडाचा झेंडा हाती घेतला तर सुभाष देशमुखांना सुध्दा भाजपकडून फटका बसू शकतो.

या सर्व घडामुडीनंतर राजकारणाचा गुंता अधिक प्रमाणात वाढला असून राणा पाटलांची डोकेदुखी ठरणार आहे. या सर्वांचा सामना करत त्यांना काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. चव्हाण हे तुळजापूर तालुक्याचे तीनवेळा आमदार राहिले आहेत. आता चौथ्यांदा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. चव्हाणांची राजकीय पायाभरणी पाहता त्यांना हरवणे खिशातली गोष्ट नाही. कारण, राष्ट्रवादीतले राणा पाटील समर्थक आज आघाडीबरोबरच आहेत. ते त्यांच्याबरोबर राहिले तर पाटलांचा विजय अधिकच सोपा होणार आहे. परंतु, तशी शक्यता खूपच कमी आहे.

पाटील-रोचकरी यांचे मनोमिलन?

ताळजापुरातील भाजपचे दस्तुरखुद्द नेते देवानंद रोचकरी यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना डावलून भाजपने राणा पाटलांना तुळजापूरची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देवानंद भाऊंचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. निवडणुकीत ते महायुतीच्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करतीलच, असे सध्या तरी सांगता येणार नाही. कारण, देवानंद भाऊंनी तालुक्यावर निर्माण केलेला वचक पाहता त्यांना माननारा मतदार भाजपकडे वळवायचा झाल्यास भाऊंना विश्वासात घेतल्याशिवाय ते कदापी शक्य नाही. कारण, पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता तुळजापुरातील राणा पाटील समर्थकांनी भाऊंच्या विरोधातच काम केले आहे. त्यामुळे भाजपचे पाटील आणि रोचकरी यांचे मनोमिलन घडवून आणण्यात पक्षाला कितपत यश मिळते, हे पहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button