breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भाऊचा धक्का ते मांडवा सागरी प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत शक्य…

मुंबई | महाईन्यूज |

गेली दोन वर्षे रखडलेला भाऊचा धक्का ते मांडवा सागरी प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांचा करता येणार आहे. ५०० प्रवासी, पर्यटकांची क्षमता आणि वाहने घेऊन जाणारे भलेमोठे जहाज २६ जानेवारीला सेवेत येणार आहे.याबाबतची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईपर्यंत जाण्यासाठी बस, टॅक्सीचा पर्याय निवडला जातो. मात्र वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. परिणामी प्रवास बराच लांबतो. याला पर्याय म्हणून सरकारकडून जलवाहतुकीचा पर्याय निवडला जात आहे. सध्या गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग, मांडवा, एलिफंटा अशा फेरी बोटसह सेवा पर्यटक व स्थानिकांसाठी आहेत. मात्र प्रवासी, पर्यटकांबरोबरच मोठय़ा संख्येने वाहने घेऊन जाणारी जहाज सेवा म्हणजेच रो पॅक्स सेवा सध्या उपलब्ध नाही.

गेल्या दोन वर्षांपासून अशी सुविधा देण्यासाठी प्रयत्न होत असतानाच अनेक तांत्रिक कारणांस्तव ती वेळेत येऊ शकली नाही. वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करण्याचा विचार असला तरी त्याआधी भाऊचा धक्का ते मांडवा अशी प्रवासी आणि वाहने घेऊन जाणारी जलवाहतूक सेवा (रो पॅक्स)सुरू केली जाणार आहे. यासाठी ग्रीस देशातून भलेमोठे जहाज मुंबईत २२ जानेवारीपर्यंत येईल. त्यानंतर २६ जानेवारीला याची सेवा देण्याचा प्रयत्न आहे. या सेवेमुळे भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास ४५ मिनिटांत होणे शक्य होईल. यामध्ये ५०० प्रवासी, पर्यटक यातून प्रवास करू शकतील. यामध्ये दुचाकी, चार चाकींबरोबरच बस, ट्रकसारखी २०० वाहने घेऊन जाता येणे शक्य होणार आहे. या सेवेच्या प्रवास भाडे दरावर चर्चा सुरू आहे. भाऊचा धक्का ते नेरुळसाठीही अशाच प्रकारची जलवाहतूक सेवा सहा महिन्यांनंतर सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे.ही यासंदर्भातली सर्व माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button