बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाला 9 दिवसांनी शोधण्यात यश
थायलंड – थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर नऊ दिवसांनी शोध लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून थाय फुटबॉल संघांतली 12 मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले होते. या संघाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू होतं.
अखेर 9 दिवसांनी या संघाला शोधण्यात यश आलं असून सुदैवानं सगळे सुखरूप आहेत. मात्र, त्यांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी कदाचित एक आठवडा किंवा महिनाभराचा अवधी आणखी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस या मुलांना गुहेतच राहावं लागणार आहे.
तेरा जणांच्या ब्रिटीश पाणबुड्यांच्या टीमनं सोमवारी (2 जुलै) रात्री 10 वाजता या मुलांना शोधलं. हा संघ गुहेत खूपच आत अडकला आहे. पाण्यामुळे गुहेत चिखलही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या संघाला खाण्याची रसद पोहोचवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही औषधं देखील त्यांना देण्यात आली आहे.
चार महिने पुरेल इतकी रसद त्यांना पुरवण्यात आली आहे. या मुलांच्या सुटकेसाठी थाय नौदल आणि थाय हवाई दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे मात्र पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. ठिकाठिकाणी चिखल आणि पाणी साचलं आहे. त्यामुळे या मुलांना गुहेबाहेर काढण्याचे दोनच पर्याय बचाव पथकाकडे आहेत. गुहेत साचलेल्या पाण्यातून पोहून ही लहान मुलं गुहेतून बाहेर येऊ शकतात. मात्र यातल्या एकाही मुलाला पोहता येत नसल्यानं पाणबुड्यांना त्यांना आधी प्रशिक्षण द्यावं लागणार आहे.
सध्या या गुहेतील पाणी बाहेर काढण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. ही गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढलं जाऊ शकतं मात्र दोन्ही पर्यायापैकी एका पर्यायाचा विचार केला तरी या मुलांना आणखी काही दिवस इथे राहावं लागणार आहे.