breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बीकेसी-चुनाभट्टी जोडपुलाची रखडपट्टी

रेल्वेच्या ब्लॉकअभावी कामात अडथळा

संकुल (बीकेसी) आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या बीकेसी-चुनाभट्टी जोडपुलाचे काम रेल्वेचा ‘ब्लॉक’ मिळत नसल्याने रखडले आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडून (एमएमआरडीए) बांधण्यात येणारा हा पूल डिसेंबर, २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र बीकेसी ते पूर्व द्रुतगती महामार्ग या प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी करणाऱ्या पुलाचे काम आता रखडले आहे.

बीकेसीमधील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने एमएमआरडीए प्रशासनाने या क्षेत्रात तीन उड्डाणपुलांचे काम हाती घेतले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलांच्या जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १६३ कोटी रुपये खर्चून दोन नवे उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. या दोन्ही पुलांची लांबी बीकेसी ते सागरी सेतू आणि सागरी सेतू ते बीकेसी अशी १.८ किमीची असेल. बीकेसीमधून पूर्व द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी धारावीतील टी जंक्शन मार्गे शीववरून जावे लागते. मात्र हे अंतर ३ किमीने कमी करण्यासाठी प्राधिकरणातर्फे मिठी नदीवरून थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर जाणारा १.६ किमीचा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी १५६ कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

बीकेसीमधील जी ब्लॉक येथून सुरू होणारा हा पूल मिठी नदीवरून एल.बी.एस. मार्ग, शीव येथील रेल्वे मार्ग, चुनाभट्टी स्थानक रेल्वे मार्ग येथून जात सोयम्मा मदानाजवळ पूर्व द्रुतगती महामार्गाला येऊन मिळेल. सध्या या पुलाचे मिठी नदीवरील अर्धे बांधकाम पूर्ण झाले आहे. सोमय्या मैदानाजवळील खांबांवर गर्डर चढविण्यात आले आहेत. मात्र शीव आणि चुनाभट्टी येथील रेल्वे रुळांच्या ठिकाणी केवळ खांब उभे करून ठेवण्यात आले आहेत. हा पूल नव्या वर्षांच्या मध्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

ब्लॉकची संख्या कमी करूनही..

शीव आणि चुनाभट्टी रेल्वे रुळांवरून पूल बांधण्यासाठी रेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक घेणे आवश्यक आहे. हे काम पाच ब्लॉकमध्ये पूर्ण करण्याच्या प्रयत्नात एमएमआरडीए प्रशासन होते. त्यासाठी प्राधिकरणाने मध्य रेल्वेला पत्रही लिहिले होते. त्यावर रेल्वेने ब्लॉकची संख्या कमी करण्याची मागणी केल्याची माहिती एमएमआरडीएमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार ब्लॉकची संख्या कमी करून रेल्वेशी त्यासंदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आला आहे, तरीही ब्लॉकच्या तारखा कळविण्यात न आल्याने पुलाचे बांधकाम रखडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button