बाळासाहेब म्हणाले ‘उध्दवला सांभाळा’ त्या अर्थ आत्ता समजला
बारामती – महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याची नवी जोडी उदयाला येत असल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवारनं काकाच्या बचावासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. अजित पवार हा राजकारणातील टाकाऊ माल आहे, अशी बोचरी टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोहितनं रोखठोक प्रत्युत्तर दिलंय.
‘उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतले नाहीत. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होऊन सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख (अजित पवारांविरोधातील संपादकीय) लिहिण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता’, असा टोला रोहित पवारनं फेसबुकवरून लगावला आहे.
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या ‘सांभाळा’चा अर्थ काल समजला. आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या, असंच त्यांना म्हणायचं असेल, अशी चपराक रोहितनं लगावली आहे.