बांधकाम कामगारांना 2000 रुपयांचे आर्थिक सहाय्य तेही थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. लॉकडाऊन असल्यानं राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद आहेत. हातावर पोट असलेल्या बांधकाम कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक नोंदीत बांधकाम कामगारांना होणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.
बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये कामगारांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दोन हजार रूपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.