breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

बंदिस्त पवना जलवाहिनीच्या पाईप आंद्रा, भामा-आसखेड योजनेला वापरणार

  • पाईप वापरण्याबाबत राज्य शासनाकडे मागितली परवानगी
  • आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी कामाला गती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या विस्ताराने भविष्यात पाणी टंचाई निर्माण होवू नये, याकरिता बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प हाती घेतला. मात्र, मावळातील शेतक-याच्या विरोधामुळे या प्रकल्पाला राज्य शासनाकडून आठ वर्षापासून स्थगिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या कामाला गती दिली आहे. पवना जलवाहिनीच्या पाईप आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाला वापरण्यास परवानगी द्यावी, याकरिता राज्य शासनाकडे महापालिकेने प्रस्ताव पाठविला आहे.

आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पिंपरी-चिंचवड शहरासाठी २.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्यात येणार आहे. यामध्ये आंद्रा धरणातून १०१ एमएलडी पाणी आणि भामा-आसखेड धरणातून १६६ एमएलडी पाणी मिळणार आहे. या महापालिकेच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. अडीच वर्षांत प्रकल्पाचे काम मार्गी लावल्यास शहराला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात एक टीएमसीने वाढ होवून पाणी टंचाईने हैराण झालेल्या सामाविष्ट भागातील विकसित भागांना लाभ होणार आहे.

आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडलेले सुमारे १०१ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देहू बंधाऱ्याजवळ उचलण्यात येईल. ते चिखलीतील आठ हेक्‍टर जागेवरील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यात येईल. इंद्रायणीकाठी असलेल्या तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली, दिघी येथील रहिवाशांना तेथून पाण्याचे वितरण करण्यात येईल. पवना धरणातून मिळणारे पाणी सध्या तेथे पुरविले जाते. ते वाचलेले शंभर एमएलडी पाणी शहराच्या अन्य भागांत दिल्यास शहराची पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराला 6 मार्च २०१४ रोजी आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पांतून पाणी घेण्यास मंजुरी मिळाली. मात्र, धरणांसाठीच्या पुनर्स्थापना खर्चापोटी २३७ कोटी पालिकेने न भरल्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जलसंपदा विभागाने परवानगी रद्द केली होती. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एप्रिल २०१८ मध्ये फेरप्रस्ताव सादर केला. त्यानंतर या फेरप्रस्तावाला मंजुरी मिळाली.

दरम्यान, शहराचा बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प रखडला आहे. गेल्या आठ वर्षापासून या प्रकल्पाला राज्य शासनाची स्थगिती आहे. त्यामुळे पवना जलवाहिनी प्रकल्पातील महापालिकेने खरेदी केलेल्या पाईप, या आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. याकरिता राज्य शासनाकडे महापालिकेने नुकताच प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास महापालिकेकडून बंदिस्त पवना जलवाहिनीसाठी खरेदी केलेल्या सर्व पाईप आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामाला वापरुन हे काम मार्गी लावण्यात येणार आहे.

असा आहे प्रकल्प

आंद्रा धरणातून १०१ एमएलडी पाणी तेथून सहा किलोमीटरवरील, तर भामा आसखेड धरणातून १६६ एमएलडी पाणी तेथून नऊ किलोमीटरवरील नवलाख उंब्रे येथे नेण्यात येईल. तेथून दीड हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याचा डीपीआर बनविलेला आहे. दरम्यानच्या काळात देहू येथील बंधाऱ्यापासून जलवाहिनीने आठ किलोमीटर अंतरावरील चिखली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेण्यात येईल. त्यामुळे आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाचे कामे जलदगतीने पुर्ण करण्यात येवू लागली आहे. 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button