breaking-newsपुणे

फेसबुक फ्रेंडनेच दागिन्यांसाठी केली तिची निर्घृण हत्या

फेसबुकवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करु नका असा सल्ला जाणकारांकडून अनेकदा दिला जातो. मात्र याकडे अनेकजण सोयीस्कररित्या दूर्लक्ष करुन अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारुन त्यांच्याशी डिजीटल माध्यमातून मैत्री करतात. मात्र अशी मैत्री कधीकधी महागात पडू शकते. फेसबुकवर अशाचप्रकारे अनोळखी व्यक्तीशी केलेल्या मैत्रीमुळे एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याचे धक्कादायक प्रकरण पुण्यात उघडकीस आले आहे. राधा अग्रवाल (४०) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्याकडून दागिन्यांसाठी तिचा फेसबुक फ्रेंड असणाऱ्या आनंद निकम (३१) याने तिची हत्या केली. कर्ज फेडण्यासाठी झटपट पैसे मिळवण्याच्या उद्देशाने दागिने चोरण्याच्या उद्देशाने राधा यांची हत्या केल्याची कबुली आनंद याने दिली आहे.

मुंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या राधा अग्रवाल हिला आनंद निकम याने चार महिन्यापूर्वी फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. राधाने ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि या दोघांमध्ये डिजीटल माध्यमातून मैत्री झाली. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या आणि गप्पांचे रुपांतर हळूहळू गाठीभेटींमध्ये झाले. पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडीचा राहणारा आनंदचा रेंज हिल्स भागामध्ये चहाचा स्टॉल आहे हे गप्पांमधूनच राधा यांना समजले. तर राधा या श्रीमंत घरातील असल्याचे समजल्यानेच आनंदने तिच्याशी मैत्री केली होती. डोक्यावर असणाऱ्या दोन लाखांच्या कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी राधाच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचा आनंदचा विचार होता.

पावसाळी सहल म्हणून ताम्हिणी घाटात फिरायला जाण्याचा प्रस्ताव आनंदने एक दिवस राधासमोर ठेवला. तेथे गेल्यावर छान फोटो वगैरे काढून आणि एका दिवसात परत येऊ असे नियोजन केल्याचे आनंदने राधाला सांगितले. छान फोटो यावेत म्हणून दागिने घालून येण्याचा सल्लाही त्याने राधाला दिला. राधानेही आनंदवर विश्वास ठेऊन २२ जून रोजी घरच्यांना मैत्रिणींबरोबर शिर्डीला जास असल्याचे सांगत घर सोडले. त्यानंतर राधा आणि आनंद स्कूटरवरुन पुण्यापासून ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटात गेले. ताम्हिणी घाटात पोहचल्यावर आनंद दागिने घालून नटून आलेल्या राधाचे फोटो काढू लागला. वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढण्याच्या बहाण्याने आनंदने राधाला झाडाजवळ उभं रहायला सांगितले आणि तिचे हात झाडाला बांधले. त्यानंतर त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून चाकूने तिचा गळा कापला. राधाच्या अंगावरील दागिने काढून घेत मृतदेह झाडाला तसाच बांधून ठेऊन आनंद घटनास्थळावरुन पसार झाला.

दोन दिवसांनंतरही आई घरी न आल्याने राधा यांच्या १९ वर्षीय मुलाने मुंढावा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. त्यांनी राधा यांच्या फोन रेकॉर्डच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना राधाने शेवटचा कॉल आनंदला केल्याचे लक्षात आले. चौकशीमध्ये आनंद हा राधाचा केवळ फेसबुक फ्रेंड असल्याचे घरच्यांकडून कळाल्यानंतर पोलिसांनी आपला तपास त्या दिशेने वळवला. पोलिसांनी आनंदचा माग काढत अखेर ११ जुलै रोजी त्याला अटक केली. त्यावेळी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आपणच राधाची हत्या केल्याचे आनंदने पोलिसांसमोर मान्य केले. आनंदने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी १२ जुलै रोजी राधाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील जंगलातून ताब्यात घेतला. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा राधाचा मृतदेह कुझलेल्या अवस्थेत झाडाला बांधलेला अढळला. घटना घडल्यानंतर तब्बल तीन आठवड्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून कर्ज फेडण्यासाठी आपण ही चोरी आणि हत्या केल्याचे आनंदने सांगितले आहे. राधा यांचे चोरलेले दागिने आनंदने ज्या नातेवाईकाडून कर्ज घेतले होते त्याला नेऊन दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी आनंदच्या नातेवाईकांच्या घरुन राधाची स्कुटर आणि सात तोळे सोने जप्त केले. अटक करण्यात आलेल्या आनंद निकमला रविवारी न्ययालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button