breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘फुलोत्पादन व तत्सम उद्योगासमोरील आव्हाने’ या विषयावरील वेबिनारमध्ये दिग्गजांशी संवाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

फुल शेती व त्यावर आधारित व्यवसाय सद्यस्थितीत फार अडचणींचा सामना करीत आहेत. नैसर्गीक फुलांना पर्याय म्हणून प्लास्टिक फुले आयात केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याच बरोबर निसर्गाची मोठी हानी होत आहे. फुलोत्पादन व त्यासंलग्न उद्योगासमोरील आव्हाने या विषयावर नुकतेच थेऊरच्या राईज एन शाइनच्या माध्यमातून वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय फुल शेतीची सद्य स्थिती पाहता या व्यवसायाला अधिक उभारी देण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर बनण्याबरोबर प्लास्टिक फुलांवर बंदी आणून नैसर्गीक फुल उद्योगाला नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या प्रमुख उद्देशाने पुणे येथील थेऊर याठिकाणी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंत्री, कृषी शास्त्रज्ञ, अधिकारी, शेतकरी, शेती संघ प्रतिनिधी आदी मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेतला. दादासाहेब भुसे कृषिमंत्री राज्य यांनी सर्व शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतली. चीन व इतर देशांमधून आयात होत असलेल्या नकली फुलांवर कायमची बंदी आणून ठोस पावले उचलत असून तसा कायदा करण्याची ग्वाही दिली. तसेच, फुलोत्पादनावर अवलंबून असलेला शेतकरी कोविड १ ९ मुळे उध्वस्त झालेला आहे. वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहे. हे पाहता या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

राईज एन शाइन प्रा. लि.च्या अध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील यांनी फुलोत्पादन व यासंदर्भातील इतर व्यवसायावर झालेल्या परिणामाची माहिती दिली. फुलशेती समोरील आव्हाने व त्या दृष्टीने उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच, निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी त्यांनी केली. फुलोत्पादन क्षेत्रात राईज एन शाइन या कंपनीच्या कार्याचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. १४ लाख ५००० चौरस फूट क्षेत्रात सुसज्ज उती संवर्धन प्रयोगशाळा कार्यान्वित असून ग्रामीण भागातील सुमारे ९०० महिलांना या क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. दरवर्षी केळीरोपे, वेगवेगळ्या शोभिवंत फुलांची ३ कोटी रोपे वितरित करीत आहे. तसेच, आकर्षक फुलांच्या नवनवीन प्रजाती भारतीय फुलोत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. याचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रकल्प खेडोपाडी राबवायला हावेत, त्यांनी पाडोळी उस्मानाबादचे उदाहरण देत यासारखे पॅटर्न उभे करण्याबाबत मार्गदर्शन केले. स्थानिक विकासाला चालना मिळण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर लिलाव प्रक्रिया, विक्री साखळी तयार करणे व जे पडीक भूखंड आहेत, अशा ठिकाणी फुलांचा बाजार निलाव प्रक्रिया जिल्हा व तालुक्यातील ठिकाणी करण्याबाबत योग्य ते निर्णय नजीकच्या काळात घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री विश्वजित कदम यांनी शेतकरी उत्पादित हवाई वाहतुकीच्या खर्चावर अनुदान व स्थानिक पातळीवर शीतगृहसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास निर्यातीमधून मिळणारे उत्पन्नात वाढ होऊ शकते, तसेच नैसर्गिक फुलांच्या आयात शुल्क ६० टक्के आहे, पण नकली किंवा कृत्रिम फुलांचे शुल्क ३० टक्के वरून जास्तीत जास्त केल्यास आयात कमी होऊन स्थानिक फुलांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त तंत्र अधिकारी गोविंद गंगाधर हांडे यांनी फुलोत्पादनासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठीची आयात निर्यात प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठीची पद्धती, नियमावली व तत्सम कायदे समजावून सांगत त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून मार्गदर्शन केले.

प्रगतशील शेतकरी (आष्टा, सांगली) तानाजीराव चव्हाण यांनी फुलोत्पादनामध्ये येत असणाऱ्या समस्यांबाबत माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुले निर्यातीसाठी तसेच स्थानिक बाजारपेठेमधील समस्या मांडल्या. आवश्यक खते व औषधे उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. याबाबत माहिती दिली लोककल्याण फुल उत्पादक संघ (पाडोळी, उस्मानाबाद) संजय पवार यानी गट समूह फुल शेतीतील आपला अनुभव सांगितलं. घाऊक फुलांचे व्यापारी (मुंबई) अभिजित दुर्वे यांनी कृत्रिम आयात फुले व कोरोनामुळे नैसर्गिक फुलांच्या बाजारपेठेवर झालेल्या परिणामाची माहिती दिली. मुंबईत बंद अवस्थेत असलेल्या फुल निलाव इमारत सुरु करण्याची मागणी केली. अभिनव प्राप्ती शेतकरी प्रशिक्षण केंद्र (बारामती) च्या स्वाती शिंगाडे यांनी आत्ताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेती प्रशिक्षणाच्या माध्यमातून सद्य समस्यांतून कसे बाहेर पडायचे याबाबतीत मार्गदर्शन केले.

कृषि शास्त्रज्ञ व भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी प्लास्टिक फुल बंदी या समाजप्रबोधनाच्या चळवळीला बळकट केल्याबद्दल व शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल डॉ भाग्यश्री पाटील यांचे कौतुक केले. या वेबिनार कार्यक्रमात ३५००० शेतकऱ्यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला व आपली मते नोंदवली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उमाकांत होवाळ यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button