breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : फ्रान्स-ऑस्ट्रेलिया पहिल्या विजयासाठी उत्सुक

  • सामन्याची वेळ – दुपारी 3.30 वाजता 

कझान – दोन वर्षांपूर्वी युरो-2016 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झालेला फ्रान्सचा संघ फिफा विश्‍वचषक स्पर्धेत त्याची भरपाई करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु त्यांच्यासमोर क गटातील आज रंगणाऱ्या पहिल्याच गटसाखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान आहे. क गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरी गाठण्यासाठी फ्रान्सला पहिली पसंती देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी त्यांना सर्वोत्तम कामगिरीच करावी लागेल.

युरो चषक स्पर्धेतील पराभवामुळे फ्रान्सच्या खेळाडूंचा रशियातील विश्‍वचषक स्पर्धेत सरस कामगिरी करण्याचा निर्धार आणखीनच भक्‍कम झाला असल्याची ग्वाही फ्रान्सचा अव्वल आघाडीवीर अन्टोनियो ग्रिझमनने दिली आहे. इतकेच नव्हे तर विश्‍वचषक जिंकण्यासाठीच फ्रान्सचा संघ तयार असल्याचा दावाही ग्रिझमनने केला आहे. गेल्या चार वर्षांत केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्याने म्हटले आहे. पात्रता पेरीत ग्रिझमन आणि स्टीव्हन एन्झोन्झी या फ्रान्सच्या खेळाडूंनी अन्य कोणाहीपेक्षा रोमांचकारी गोल लगावले आहेत. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची पुनरावृत्ती ही जोडी कशी करते हीच उत्सुकतेची बाब आहे.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडूसुद्धा कोणतेही दडपण न घेता फ्रान्सशी झुंज देण्यास तयार आहेत. पात्रता फेरीत जगातील अन्य कोणत्याही संघापेक्षा जास्त, म्हणजे तब्बल 22 सामने खेळून त्यांनी विश्‍वचषक स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. त्यातील दोन प्ले-ऑफ लढतींपैकी होंडुरासवर मिळविलेल्या 3-1 अशा विजयामुळे त्यांचा रशियातील प्रवेश निश्‍चित झाला. प्रशिक्षक बर्ट व्हॅन मार्विक यांनी खेळाडूंकडून करून घेतलेल्या तयारीची सर्वांना जाणीव आहे. मार्विक यांनी आणलेल्या समस्त सपोर्ट स्टाफबद्दल प्रशंसोद्‌गार काढताना ऑस्ट्रेलियाचा फॉरवर्ड रॉबी क्रूस म्हणाला की, असे प्रशिक्षक मिळाल्याबद्दल आम्ही नशीबवानच आहोत. या सर्व कोचिंग स्टाफच्या साहाय्याने त्यांनी आमची डावपेचात्मक तयारी अत्यंत उत्तमरीत्या करून घेतली आहे. सहप्रशिक्षक मार्क व्हॅन बॉमेल हे तर सदैव आमच्यासोबत मैदानावर असतात. तसेच पोझिशनिंग आणि डावपेच याबाबत ते खेळाडूंशी सातत्याने संवाद साधतात आणि त्यांना साहाय्य करतात. त्यांचा सर्व खेळाडूंवर चांगला प्रभाव आहे आणि सरावाचा सर्वोत्तम उपयोग स्पर्धेत कसा करून घेता येईल, याबाबत आम्हाला आत्मविश्‍वास आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button