breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बस वापरावर भर

प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच भविष्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात केले. येत्या दोन ते तीन वर्षांत मुंबई पर्यावरणपूरक शहर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याचा पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन वीज निर्मितीचे प्रकल्प सुरु केले असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील १५० नगरपरिषदांनी कचऱ्यावर प्रक्रिया करुन केलेल्या खताचा शेतकऱ्यांना उपयोग होत आहे. यामुळे यापुढे कचराभूमीसाठी जागा दिली जाणार नाही, असा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनात राज्याच्या कामाचे देशभर कौतुक होत असून प्लास्टिक बंदीबाबत देशात राज्य प्रथम क्रमांकावर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. नद्यांचे, समुद्र किनाऱ्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जात असून रासायनिक, प्रदूषित पाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘पुढील दोन महिन्यांत प्लास्टिक बंदी नव्वद टक्क्य़ांवर आणली जाईल. तसेच कचऱ्याचे सेंद्रीय खत करण्यावर अधिक लक्ष दिले जाईल,’ असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत करुन पुढील काळात पर्यावरणावर अधिक काम करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्काराचे वितरण तसेच हवा गुणवत्ता अहवाल आणि ‘प्लास्टिक बंदीचे शिवधनुष्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button