breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडसंपादकीय

पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारितेतील ‘केसरी’ हरपला : बाळासाहेब ढसाळ

पत्रकारिता कशी असावी, याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण गणले गेलेले आणि ज्यांना पत्रकारितेचे विद्यापीठ म्हणून संबोधता येईल असे ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे काल सोमवार दि. २३ जानेवारी रोजी निधन झाले. पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारितेचे न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. त्यांचे निधन अनेकांना झटका आणि चटका देणारे ठरले आहे. एक निर्भीड, सच्च्या पत्रकाराला हे शहर आणि एकूणच पत्रकारिता मुकली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सलग पस्तीस वर्षे एकाच केसरी या वृत्तपत्राशी निस्सीम नितीमत्तेने संलग्न राहिलेले विजय विनायक भोसले यांच्या पासून पत्रकारितेचे धडे घेतलेले अनेक पत्रकार शहरात आहेत. अनेकांना पत्रकारितेचे कोणतेही ज्ञान नसताना केवळ अनुभवाच्या जोरावर विजय भोसले यांनी तयार केले, प्रशिक्षित केले. 

निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकारिता हा एकमेव बाणा अंगी बाणवून विजयराव या शहरातच नवे तर महाराष्ट्रात पत्रकार म्हणून गाजत आणि वाजत राहिले. “भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा” हे संतश्रेष्ठ तुकोबारायांचे विधान शब्दशः खरे राखण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चुकीला चूक म्हणणे आणि योग्याला योग्य न्याय देणे, यासाठी त्यांनी आपली पत्रकारिता उपयोगात आणली. अनेक उभारिच्या आणि होतकरू राजकारण्यांना खऱ्याखोट्याची पारख करून आपल्या लेखणीने त्यांनी नावारूपाला आणले. एक योग्य मार्गदर्शक आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी अनेकांना अक्षरशः घडवले, समाजकारणाचे, राजकारणाचे धडे दिले. त्यांना आपले मार्गदर्शक म्हणून संबोधण्यात धन्यता मानणारे अनेक जण अभिमानाने त्यांचे नाव घेतात. 

पिंपरी चिंचवड शहराच्या गाव ते स्मार्ट सिटी या प्रवासाचे एक द्रष्टे साक्षीदार म्हणून विजय भोसले यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाकडे पाहिले जाते. या शहराच्या विकासात आणि भरभराटीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. चांगले वाईट आणि खरेखोटे यांची जण असलेला पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले विजय भोसले एकमेवाद्वितीयच! गल्लीतील सामान्य कार्यकर्त्यांपासून अगदी मंत्री खासदारांपर्यंत कोणालाही तोंडावर खडसावणारे, त्यांच्या चूका अगदी हिमतीने मांडणारे ते एक समाजकारणी होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्याच बरोबरीने निष्ठा, नीतिमत्ता आणि नियमन यांचे एक उत्कृष्ठ उदाहरण म्हणून विजय भोसले यांचे नाव घेत येईल. 

चार चव्वल जास्त मिळावेत म्हणून अंगवस्त्र बदलल्याप्रमाणे मालक आणि वृत्तपत्र बदलण्याची सवय लागलेल्या मंडळींमध्ये एकाच वृत्तपत्रात, दैनिक केसरी मध्ये विजयरावांचे निम्मे आयुष्य घालवणे हे त्याचेच प्रतीक आहे. शेवटपर्यंत चक्षुर्वैसत्य समजून घेऊन बातमीदारी करणारा पत्रकार म्हणून असलेला आपला लौकिक त्यांनी जपला. हृदयविकाराचा त्रास झाला तेव्हा विजय भोसले एक बातमीसाठी भोसरीला गेले होते. तेथेच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. बातमीशी एव्हढा प्रामाणिक असलेला माणूस, दुसरा सापडणे कठीण. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे सगळे करताना आपल्यातला रसिक माणूस जिवंत ठेवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. त्यांच्या तोंडून लावणी अगर कव्वाली ऐकलेले लोक शहरातील कानाकोपऱ्यात आढळून येतील.

आपले निम्मे आयुष्य केसरीसाठी खर्च करून समाजकारण, राजकारण आणि एकूणच समाजप्रश्नांवर आपले भाष्य सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करणारे विजय भोसले शहरातील पत्रकारितेत “केसरी” म्हणूनच गरजले आहेत. अशा या केसरीस आदरपूर्वक श्रध्दांजली!
– बाळासाहेब ढसाळ, संपादक नवनायक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button