breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

प्रकाश मेहता यांचे मंत्रिपद धोक्यात?

लोकायुक्तांच्या अहवालात ताशेरे

दक्षिण मुंबईतील इमारत पुनर्विकासात विकासाला झुकते माप देताना ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ हा शेरा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अंगाशी येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाची चौकशी केलेल्या लोकायुक्तांनी मेहता यांच्यावर ताशेरे ओढले असून, आगामी विधानसभा निवडणूक तसेच पुढील आठवडय़ात सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेता मेहता यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येऊ शकते.

दक्षिण मुंबईतील इमारत पुनर्विकास योजनेत विकासकाचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होईल अशा पद्धतीने मेहता यांनी निर्णय घेतला होता. तसेच ‘फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’ असा शेरा मारला होता. झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविताना विकासकाला झुकते माप देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी आवाज उठविल्यावर या आरोपाची लोकायुक्तांकडून चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मंत्र्यांवर आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही चौकशीविना अभय देण्यात आले, पण मेहता यांच्यावरील आरोपांवर लोकायुक्तांकडून चौकशीची घोषणा झाली तेव्हाच मेहता यांचे मंत्रिपद अडचणीत आल्याचे मानण्यात येत होते.

मेहता यांनी विकासकाचा फायदा होईल अशा पद्धतीने निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने मेहता यांच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसली तरी मेहता यांची निर्णय प्रक्रिया स्वच्छ आणि प्रामाणिक नव्हती, असे ताशेरे लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. टहलीयानी यांनी ओढले आहेत. मेहता यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली असती तरी विकासकाचा २०० कोटींपेक्षा जास्त फायदा झाला असता, असे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांना अवगत केले हा शेरा लिहिण्यात आपली चूक झाली, अशी कबुली मेहता यांनी लोकायुक्तांपुढील चौकशीत दिली होती.

मेहता यांनी शेरा लिहिला असला तरी मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नव्हता, असेही लोकायुक्तांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. लोकायुक्तांनी ताशेरे ओढल्याने मेहता यांना राजीनामा देण्यास सांगण्यात येईल, असे भाजपमध्ये बोलले जाते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गैरव्यवहारप्रकरणी ताशेरे ओढलेल्या मंत्र्याला कायम ठेवणे भाजप आणि मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचे ठरू शकते. पुढील सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. लोकायुक्तांच्या ताशेऱ्यांमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळू शकते. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. यामध्ये मेहता यांचे मंत्रिपद जाऊ शकते.

भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी अभय दिले. प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. भ्रष्ट मंत्र्याला मुख्यमंत्री पाठीशी घालणार का ? मेहता यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.    – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. मेहता यांची हकालपट्टी किंवा त्यांनी राजीनामा न दिल्यास भाजप भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालते हे सिद्ध होईल.   – सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button