breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पोलिसांवर हल्ला करणारे सहा आरोपी अटकेत

जोगेश्वरीतील प्रकरण; मारहाणीचा बनाव केलेल्या तरुणालाही बेडय़ा

अंबोली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या जमावापैकी सहा जणांना गुरुवारी बेडय़ा ठोकण्यात आल्या. पोलिसांनी मारहाण केल्याचा बनाव करून जमावाला चिथावणाऱ्या नोमान खारोडीया या तरुणाचाही त्यात समावेश आहे. जमावातील उर्वरित आरोपींची शोधाशोध सुरू असून त्यांना लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले.

या हल्ल्याची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना अंबोली पोलिसांना दिल्या आहेत.

जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळील एस. व्ही. मार्गावरील चौकात बुधवारी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात अंबोली पोलीस कारवाई करत होते. पेशाने व्यावसायिक असलेल्या नोमानला विनाहेल्मेट दुचाकीवरून आल्याने नाकाबंदीत थांबवण्यात आले. दुचाकीला अडकवलेले हेल्मेट दाखवून त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पळून जाण्यासाठी त्याने पोलीस शिपाई सागर कोंडविलकर याच्या हातावर दुचाकीच्या चावीचा फटका मारला. त्यामुळे सागरच्या हातातून रक्त येऊ लागले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नोमानला सागरने पकडले. तेव्हा त्याच्या हातावरील रक्त नोमारच्या शर्टला लागले. ते पाहून नोमानने पोलिसांनी मारल्याचा बनाव रचला. जमावाला चिथवले. पुढे जमावाने हल्ला केला. त्यात सागरसह अंबोलीचे पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले.

नोमानसह जमावाविरोधात दंगल, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याला मारहाण या कलमांनुसार गुन्हा नोंदवला. गुरुवारी नोमानसह सहा जणांना अटक केल्याची माहिती, अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button