breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पूल दुर्घटनेप्रकरणी आरोपी कंपनीला पूल तपासणीचे काम

गुजरातमधील सूरत शहरात पूल कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आणि सूरत पालिकेने काळय़ा यादीत टाकलेल्या कंपनीला मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील आठ-नऊ पुलांच्या तपासणीसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची बाब उघडकीस आली आहे. सूरत पोलीस आणि पालिकेने केलेल्या कारवाईची माहिती कंपनीने सादर केली होती का याची चाचपणी पालिकेच्या पूल विभागाकडून करण्यात येत आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर पालिकेने मुंबईमधील पुलांच्या संरचनात्मक तपासणीसाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली होती. पश्चिम उपनगरांमधील आठ-नऊ पुलांच्या तपासणीसाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी टीपीएफ इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नियुक्ती केली होती. सदर कामासाठी या कंपनीला सुमारे एक कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आला आहे. एस. ए. भोबे अ‍ॅण्ड असोसिएट प्रा. लिमि आणि टीपीएफ एसए बेल्जिअम यांच्या संयुक्त विद्यमाने टीपीएफ इंजिनीअरिंग कंपनी सुरू करण्यात आली आहे. मात्र, यापैकी एस. एन. भोबे अ‍ॅण्ड असोसिएट प्रा. लि. या कंपनीला सूरत पालिकेने काळय़ा यादीत टाकल्याची बाब समोर येत आहे. या कंपनीला सूरतमधील पुलाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात आले होते. मात्र, २०१४मध्ये सूरतमधील पूल कोसळून १० जण दगावल्याच्या घटनेनंतर या कंपनीला २०१५मध्ये पाच वर्षांसाठी काळय़ा यादीत टाकण्यात आले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे याच कंपनीने २०१७ मध्ये सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील वांद्रे पॅलेस ते वरळी नाक्या दरम्यानच्या कामासाठी टीपीएफ प्लेंज सेनॉर आणि टीपीएफ इंजिनीअरिंग प्रायव्हेट या कंपन्यांची संयुक्तरित्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र एस. एन. भोबे असोसिएटशी संबंध असल्याची बाब उघड न केल्यामुळे या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारपदी नियुक्ती करण्यास पालिकेने नकार दिला होता.

एस. एन. भोबे असोसिएट कंपनीचे सूरत पालिकेने काळ्या यादीत टाकलेले नाव आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाबाबत विचारणा करण्यासाठी सागरी किनारा मार्ग विभागाने सूरत पालिका आणि उमरा पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार केला होता. सूरत पालिका आणि उमरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एस. एन. भोबे असोसिएटचे संचालक अतुल भोबे आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सागरी किनारा मार्ग विभागाला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या कंपनीची निविदा सागरी किनारा मार्ग विभागाने नामंजूर केली.

नवी मुंबईतील कंपनी

टीपीएफ इंजिनीअरिंग प्रा. लिमि. कंपनीची १३ ऑक्टोबर २०१५ रोजी स्थापना करण्यात आली असून या कंपनीची वाशी, नवी मुंबई येथे नोंदणी करण्यात आली आहे. अतुल दामोदर भोबे, दामोदर भोबे हे भारतीय, तर बेल्जिअममधील थॉमस स्पिटल्स यांनी भागीदारीत ही कंपनी स्थापन केली आहे. काही महिन्यातच

काळ्या यादीत नाव टाकलेली एस. एन. भोबे असोसिएट कंपनी टीपीएफ इंजिनीअरिंग प्रा. लिमि.मधून एस. एन. भोबे असोसिएटला वेगळे करण्यात आले. अतुल भोबे, मिनाक्षी भोबे आणि थॉमस स्पिटल्स हे तिघेही एस. एन. भोबेचे संचालक आहेत.

आरोप फेटाळले

टीपीएफ कंपनीने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचा अथवा आपले नाव काळ्या यादीत टाकल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. एस. एन. भोबे अ‍ॅण्ड असोसिएट आणि टीपीएफ इंजिनीअरिंगविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. ‘सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कामासाठी आमचे नाव रद्द का करण्यात आले याची आम्हाला कल्पना नाही. त्याबाबतची कोणतीही सूचना करण्यात आलेले नाही. पालिकेच्या सल्लागारांच्या पॅनेलवर टीपीएफ इंजिनीअरिंगचा समावेश असून ही कंपनी पालिकेसमवेत काम करीत आहे, ’ असे स्पष्टीकरण या कंपनीकडून देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button