breaking-newsआंतरराष्टीय

पुलवामा हल्ल्यामागे ‘मोहम्मद भाई’चे डोके

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ४० जवानांचे बळी घेणाऱ्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागे फारसा परिचित नसलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदासिर अहमद खान ऊर्फ ‘मोहम्मद भाई’ हा होता, असे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे.

पुलवामा जिल्ह्य़ाचा रहिवासी असलेल्या आणि पदवीधारक वीजतंत्री असलेल्या २३ वर्षांच्या खान याने दहशतवादी हल्ल्यात वापरले गेलेले वाहन आणि स्फोटके यांची व्यवस्था केली होती, असे आतापर्यंत गोळा करण्यात आलेल्या तपासाची साखळी जोडल्यानंतर सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्रालच्या मिर मोहल्ल्याचा रहिवासी असलेला खान २०१७ साली केव्हातरी जैश-ए-मोहम्मदमध्ये कार्यकर्ता म्हणून सामील झाला. नंतर नूर मोहम्मद तांत्रे ऊर्फ ‘नूर त्राली’ याने त्याला जैशच्या मुख्य प्रवाहात आणले. नूरने जैशचे काश्मीर खोऱ्यात पुनरुज्जीवन करण्यास मदत केल्याचे मानले जाते.

तांत्रे डिसेंबर २०१७ मध्ये मारला गेल्यानंतर खान १४ जानेवारी २०१८ला त्याच्या घरून बेपत्ता झाला आणि तेव्हापासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यातील बसवर स्फोटकाने भरलेले वाहन धडकवून त्याचा स्फोट घडवणारा आदिल अहमद दार हा खानच्या सतत संपर्कात होता, असे तपासकर्त्यांनी सांगितले.

पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खान याने एका आयटीआयमधून वीजतंत्रीचा एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम केला. एका मजुराचा सगळ्यात लहान मुलगा असलेला खान हा फेब्रुवारी २०१८ मध्ये संजवान येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही सहभागी होता, असे मानले जाते. या हल्ल्यात ६ जवान व १ नागरिक ठार झाले होते.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने खानच्या घरावर २७ फेब्रुवारीला छापा मारला होता. हल्ल्यात वापरली गेलेली एक मारुती इको मिनी व्हॅन जैशच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्यांने हल्ल्याच्या १० दिवसांपूर्वी खरेदी केली होती. सज्जाद भट नावाचा हा दहशतवादी तेव्हापासून फरार असून आता सक्रिय दहशतवादी झाला असल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button