पुन्हा ‘याड’ लावायला येणार आर्ची-परशा!
मुंबई : महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या ‘सैराट’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘सैराट’मधला परशा अर्थातच आणि आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. इतकेच नाही तर लंगड्या (तानाजी) देखील तुमच्या भेटीला येत आहे.
आर्ची-परशाच्या चाहत्यांना ‘सैराट’च्या पडद्यामागची गोष्ट अनुभवायला मिळणार आहे. ‘सैराटच्या नावानं चांगभलं’ हा कार्यक्रम लवकरच येत आहे. आता टीव्हीवर एका चॅनेलवर हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे. ‘सैराट’च्या सेटवर आर्ची आणि परशाने केलेली धमला, गमतीजमती आणि लंगड्याबरोबरच इतर सहकार्यांनी कशी मदत केली. याची माहिती देणारा हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे ‘सैराट’चा फिवर सगळीकडे पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे आर्ची सातवीमध्ये असताना ‘सैराट’च्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. आर्ची नववीत असताना म्हणजेच २०१६ ला हा चित्रपट रिलीज झाला होता. आता २९ एप्रिल २०१८ ला ‘सैराट’ला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने परशा आणि आर्चीला पाहायची संधी मिळणार आहे. आर्ची नागराजला भेटण्यास म्हणून गेली…आणि तिला या चित्रपटात कसा ब्रेक मिळाला इथंपासून ते परशा-आर्चीचा झिंगाट डान्स आणि ‘सैराट’ कसा साकारला? इथंपर्यंतची इत्यंभूत माहिती ‘सैराट’च्या नावानं चांगभलं मध्ये दाखवलं जाणार आहे. त्यामुळे परशा-आर्चीच्या गप्पा कशा रंगतात, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.