breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील भाजपात लवकरच उलथापालट

भाजप शहराध्यक्षांसह विविध पदाच्या निवडी, जून्या निष्ठावंत व ब्रॅंडेड कार्यकर्त्यांना संधी

प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड माधवी नाईक पाहणार निवडणुकीचे कामकाज

पिंपरी |महाईन्यूज|विकास शिंदे

राज्यात सत्तेवरुन पायउतार होताच भारतीय जनता पार्टीने पक्ष बांधणी आणि बूथस्तरावर संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काम सुरु केले आहे. पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमधील भाजप शहराध्यक्ष, मंडल अधिकारी आणि बूथ अध्यक्षाच्या निवडणूक येत्या पंधरा दिवसात पुर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी जोरदार लाॅबिंग सुरु असून आता नव्या की जून्या निष्ठावंत गटाच्या नेत्याला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, पक्षातंर्गत निवडणुकीत जून्या निष्ठावंत व ब्रॅंडेड कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असं सुतवाच प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पिंपरी चिंचवड शहर हे एकेकाळी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, 2014 नंतर राज्यात भाजप सरकार सत्तेत आली. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यास भाजपला यश आले. तीन नगरसेवकाचे तब्बल 77 नगरसेवक निवडून आले. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून लक्ष्मण जगताप तर भोसरीतून महेश लांडगे यांच्या रुपाने विधानसभेवर कमळ फुलले आहे. यामुळे शहरात निश्चितच भाजपची ताकद वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप – शिवसेनेला महाजनादेश दिला. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवून काॅंग्रेस – राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. त्यामुळे भाजपने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाअंतर्गत निवडणुक घेण्यात येत आहे. त्या निवडणुकीत आयारामाना बाजूला ठेवून जून्या निष्ठावंत व ब्रॅंडेड कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सुतवाच प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांची शहराध्यक्ष पदाची तीन वर्षे कालावधी निवडणुकपुर्वीच संपली आहे. पुण्याच्या शहराध्यक्ष माधूरी मिसाळ यांच्या निवडीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील निवड होईल, असे वाटत होते. परंतू, विधानसभा निवडणुकीमुळे त्या पुढे ढकलल्या होत्या. मात्र, पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाची निवडणुक 10 ते 15 डिसेंबर, 5 डिसेंबरपर्यंत मंडल अध्यक्ष आणि 30 नोव्हेंबरपर्यंत प्रभागातील बूथ अध्यक्षाची निवडणुक पार पडणार आहे. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून महिला आघाडीच्या प्रदेशध्यक्षा अॅड माधवी नाईक या कामकाज पाहणार आहेत. तर त्यांना सहाय्यक म्हणून अॅड मोरेश्वर शेडगे, प्रमोद निसळ असणार आहेत.

भाजप शहराध्यक्षपदावर कोणाला संधी?

पिंपरी चिंचवडच्या भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा तीन वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष पदाची निवड येत्या पंधरा दिवसात पुर्ण होईल, याकरिता नव्या व जून्या गटात शहराध्यक्ष पदासाठी लाॅबिंग सुरु झाले आहे. परंतू, भाजप शहराध्यक्ष पदासाठी पक्षश्रेष्ठी पुन्हा लक्ष्मण जगताप यांचीच निवड करणार की नव्या चेह-याला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button