पुण्यात हेल्मेट न वापरणा-या दुचाकी बहाद्दरांना 81 कोटींचा दंड
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुण्यामध्ये हेल्मेट न वापरता वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दुचाकीचालकांना तब्बल ८१ कोटींचा दंड बजावण्यात आला आहे.
पुणे शहरात १ जानेवारी २०१९ पासून न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांविरोधात कारवाई सत्र सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी ही मोहीम हाती घेऊन वर्षभरात १६ लाख दुचाकी चालकांवर कारवाई केली आहे. त्यातून तब्बल ८१ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईच्या विरोधात शहरातील अनेक संघटनाकडून वर्षभर आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला होता. मात्र, तरीदेखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू ठेवण्यात आली होती. वर्षभरात १६ लाख २० हजार दुचाकी चालकांवर कारवाई केली. त्यातून ८१ कोटी ८९ लाख रुपयांचा दंड बजावण्यात झाला आहे. मात्र, त्यापैकी केवळ २१ कोटींचा दंड वसूल करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलं आहे. तर, उर्वरीत ६० कोटी ८९ लाख रुपयांचा दंड थकीत आहे. ज्या दुचाकी चालकांनी अद्यापपर्यंत दंड भरला नाही, अशा चालकांकडून वाहतूक पोलिस शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून दंड वसूल करत आहे.