breaking-newsTOP Newsपुणे

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक : संग्राम देशमुख, सुभाष देशमुख, मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेत

पुणे । प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा चंद्रकांतदादा यांनी जिकली होती ती स्वतःकडे राखण्यासाठी भाजपकडून यंत्रणा कामाला लागली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपकडून यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग चालू होण्यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया भाजपच्यावतीने मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे त्याला ब्रेक बसला होता. मात्र, आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची तयारी पक्षाच्यावतीने सुरु झाली आहे. निवडणूक जाहीर झाली असली तरी पक्षाचा उमेदवार अद्यापही निश्‍चित झालेला नाही. गुरुवार (ता. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपकडे अद्यापही एक आठवड्याची मुदत उमेदवार निश्‍चित करण्यासाठी आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मागील दोन निवडणुकीत याठिकाणहून माजीमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा राखणे भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेचे झाले आहे. पण, त्या दोन निवडणुकांची व आताची स्थिती यामध्ये खूप फरक पडला आहे. राज्यातील सत्ता महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ही जागा खेचून घेण्याच्या तयारीत महाविकासआघाडी आहे. भाजपकडून पाटील यांचा वारसदार म्हणून कोणाचे नाव निश्‍चित केले जाते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविणार आहेत. यापूर्वी दोनवेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून विजय मिळविल्यामुळे त्यांचा वारसदार ठरविताना पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सांगली भाजपचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे ते बंधू आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यात साखर कारखाना आहे. त्यामुळे पदवीधरची उमेदवारी आपल्यालाच मिळेल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पुणे भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. संघ परिवारातील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मावळातील रवींद्र भेगडे यांनी सर्वाधिक नोंदणी करून आपलीही जोरदार तयारी केली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची चर्चा गेल्या दोन दिवसांत सुरू झाली आहे.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजीमंत्री सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनीही पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पदवीधर मतदार नोंदणीचे त्यांनी मेळावा घेऊन नोंदणी वाढविण्यावर भर दिला होता. त्यांनीही आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. इच्छुक अनेकजण आहेत. पण, पक्ष कुणाला संधी देणार हे 12 नोव्हेंबरपूर्वी निश्‍चित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button