breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

मोशी ते राजगुरुनगर या टप्प्यातील रस्त्याचे लवकरच सहापदरीकरण

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (रा. म. ६०) मोशी (इंद्रायणी नदी) ते राजगुरुनगर या टप्प्यातील रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे. एप्रिल महिन्यात या कामाच्या निविदा निघणार आहेत. यामुळे चाकण चौकातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

सोमवारी (दि. २) संसदभवनात शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांच्या कामासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत मोशी ते राजगुरुनगर (रा. म. ६०) तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. खासदार डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामांची टेंडर प्रक्रिया प्राधान्याने करण्याच्या स्पष्ट सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दिल्या.

मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली (राजगुरुनगर) टप्प्यातील सहापदरीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार असून दोन महिन्यांत भूसंपादन करण्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाºयांनी मान्य केले असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि एप्रिल महिन्यात निविदा काढा, असे आदेश दिले.

यामुळे चाकण चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईन्मेंटचा विषय डॉ. कोल्हे यांनी उपस्थित करताच केंद्रीयमंत्री गडकरी यांनी महामेट्रोच्या ब्रिजेश दीक्षित यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून मेट्रो अलाईन्मेंटबाबत सूचना दिल्या.

दरम्यान, या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा- चौफुला या रस्त्याचे काम केल्यास मुंबईकडून सोलापूरकडे जाणा-या जड वाहतुकीसाठी उत्तम पर्याय होऊ शकेल, शिवाय अहमदनगरकडून सोलापूरकडे जाणा-या वाहतुकीसाठी पर्याय निर्माण होऊन पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडली. त्यावर या रस्त्याचाही सविस्तर प्रकल्प अहवालही तयार असून १-२ महिन्यांत या रस्त्याची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button