breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे: गळक्‍या इभ्रती’नंतर आता आंदोलनाचे शिंतोडे

  • सर्वपक्षीय विरोधकांचे छत्री आंदोलन : सत्ताधारी, प्रशासनाला विचारला जाब
  • महापालिका विस्तारित इमारतीतील गळतीचे पडसाद

पुणे – महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याहस्ते उद्‌घाटन झाले. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी सभागृहाचे तोंडभरून कौतुक करत असतानाच सभागृहात पाणी गळतीला सुरूवात झाली. त्यानंतर विरोधकांनी टीका केलीच, परंतु गुरूवारी महापालिका मुख्यसभेत या घटनेचे पडसाद उमटले. विरोधकांनी छत्र्या घेऊन सभागृहात आंदोलन केले.

महापालिकेची मुख्यसभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात छत्र्या घेऊनच “एन्ट्री’ केली. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. घिसाडघाईमुळेच असे झाले, असा खरमरीत आरोपही केला.

छत्र्या घेऊन येण्याला सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला; मात्र नंतर त्यांना आत येऊ देण्यात आले. याच नव्या विस्तारीत इमारतीच्या गॅलरीचा एक तुकडा पडल्याची घटना घडल्याने त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी हेल्मेटही घालून सभागृहात आंदोलन केले.

तसेच सभागृहात विरोधी पक्षाच्या अन्य सदस्यांना बोलू न देता फक्त गटनेत्यांनाच महापौरांनी बोलण्याची परवानगी दिल्याने त्यावरूनही सभागृहात बराच गदारोळ झाला.

“गळतीच्या प्रकारामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्याच अंगावर शिंतोडे उडवून घेतले’ अशी टीका दत्तात्रय धनकवडे यांनी केली. “ऑक्‍युपेशन प्रमाणपत्र दिल्याशिवाय महापालिका इमारतीत रहायला परवानगी देत नाही. अशावेळी या इमारतीच्या बाबतीत “क्वालिटी’चा विचार केला गेला नाही का, असा प्रश्‍न धनकवडे यांनी उपस्थित केला. तसेच अन्य झालेली कामेही कशी झाली आहेत ती पाहवी लागतील,’ असेही धनकवडे म्हणाले.
“नव्या इमारतीमध्ये पार्टीशन्सला भिंतीऐवजी प्लायवूडचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित केली नसेल, तर मोठी दुर्घटना घडू शकते,’ असे अविनाश बागवे म्हणाले.

“महापालिकेतील पदाधिकारी बदलणार, असे कानावर आल्याने घिसाडघाईने नवीन इमारतीचे उद्‌घाटन करण्याचा घाट घातला’ असा दावा सुभाष जगताप यांनी केला. “विस्तारित इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल गेल्या सहा महिन्यांपासून अनेकदा संबंधित खात्याकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले,’ असा आरोपही जगताप यांनी केला. “कचरा साठल्याने पाणी साचून गळती झाली हे कारण अत्यंत चुकीचे आहे,’ असेही ते म्हणाले. “सत्ताधाऱ्यांच्या चुका, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला, तर हे लोक अंगावर धावून येतात. गेल्या एक वर्षापासूनचा हा अनुभव आहे. वास्तूची जी गळती झाली त्यामुळे शरमेने मान खाली गेली,’ असेही जगताप म्हणाले.

महापालिकेचे सध्याचे सभागृह 1952 मध्ये बांधले त्यावेळीही घाईघाईत बांधल्याची टीका झाल्याचा इतिहास गोपाळ चिंतल यांनी सांगितला. राष्ट्रवादीनेही 2015 मध्ये विस्तारित वास्तूच्या भूमिपूजनाची घाई केली होती, असेही ते म्हणाले.

महापालिकेचा नावलौकिक मातीत घालण्याचे काम भाजपने केले आहे. ज्या जाहिराती लावल्या त्यातही विरोधी पक्षांच्या प्रमुखांची नावे का टाकली नाहीत? सन्मानाने वागणूकही दिली नाही. या कार्यक्रमाबद्दल विचारविनिमयही केला नाही. आता या विषयात चुकांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. कोणालाही एकाला जबाबदार धरून, त्याला फासावर लटकवून उपयोग नाही.
-चेतन तुपे, विरोधी पक्षनेते.

हा महापौरांचा दोष नाही हा त्यांना ज्यांनी सल्ला दिला ते सल्लागारच चुकीचे आहेत. आम्ही खासगीत जे सल्ले तुम्हांला द्यायला पाहिजेत ते जाहीरपणे मुख्यसभेत द्यावे लागत आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा ठराव अजूनही पक्षनेत्यांनी मंजूर केला नाही; आता तर कार्यक्रमही पार पडला आहे. याशिवाय दोन प्रकारच्या पत्रिका छापल्या आहेत. एका पत्रिकेमध्ये विरोधी पक्षांची सर्वांची नावे आहेत आणि दुसऱ्या पत्रिकेमध्ये आमचे तर सोडाच, परंतु उपमहापौरांचे देखील नाव नाही. उपमहापौरांच्या पचनशक्तीला मी खूप मानतो. कारण, ते त्यांचा वारंवार होणारा अपमान पचवतात.
– अरविंद शिंदे, गटनेते, कॉंग्रेस.

एवढ्या घाईने इमारतीचे उद्‌घाटन का केले? चुकीचा कारभार सुरू असून, महत्त्वाचे निर्णय घेताना आम्हांला विश्‍वासात घेतले जात नाही.
– संजय भोसले, गटनेते, शिवसेना.

झालेल्या गळतीच्या घटनेबाबत सगळ्यांच्याच भावना आहेत. “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करावे, असे पत्र स्थायी समितीने महापालिका आयुक्तांना पाठवले होते. दहा दिवसांत “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत आश्‍वासन दिले आहे. कार्यक्रमाला सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका होती, त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये.
– मुक्ता टिळक, महापौर.

ळतीचा झालेल्या प्रकार चुकीचाआहे. परंतु, ही बाब पहिल्यांदाच आणि भाजपच्याच सत्तेच्या काळात झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे ते म्हणाले. म्हात्रे पूल बांधला, तेव्हा तोही खचला, त्यानंतर नीलायमचा पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाचा नकाशा चुकला हे जाहीर मान्य करावे लागले होते. त्यामुळे आताच ही टीकेची अवदसा का आठवली?
– जयंत भावे, भाजप सदस्य.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button