breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांना “डोअरस्टेप’ सेवा नको?

 

  • शुल्क परवडेना : चार महिन्यांत फक्‍त 25 जणांनी घेतला लाभ

पुणे – ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या सेवा घरबसल्या मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाने पुणेकरांसाठी “डोअरस्टेप’सेवा सुरू केली होती. मात्र, याला पुणेकरांचा थंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या चार महिन्यांत फक्‍त 25 ते 30 पुणेकरांनी सेवेचा लाभ घेतली आहे. महापालिकेने नेमलेल्या संस्थेकडून घरपोच सेवा देण्यासाठी 87 रुपयांचे शुल्क आकारले जात असल्याने सेवेस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

पेन्शनरांचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. त्यामुळे अनेक शासकीय अधिकारी, तसेच कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पुण्यात राहण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शहरात ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. तर अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले काम, शिक्षणानिमित्त परदेशात असल्याने हे नागरिक एकटेच राहतात. वयोमानामुळे त्यांना महापालिकेचा मिळकतकर, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखले मिळविणे तसेच पालिकेशी संबधित इतर सशुल्क सेवांचा लाभ घेण्यात अडचणी येतात.

अनेकदा क्षेत्रीय कार्यालयात नेमक्‍या अधिकाऱ्यांची माहिती नसणे तसेच मुख्य इमारतींमध्ये या कामासाठी जाणे या ज्येष्ठ नागरिकांना सोयीची ठरत नसल्याने, त्यांना घरापर्यंत जाऊन सेवा देण्यासाठी महापालिकेने “डोअरस्टेप’ सेवा सुरू केली आहे. त्यासाठीचे काम पालिका प्रशासनाने “व्हीएफएस’ या संस्थेस दिले आहे. त्यासाठी पालिकेने “पीएमसी केअर’ या उपक्रमांतर्गत टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला असून यावर फोन केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या सोयीनुसार या संस्थेकडून त्यांना हव्या असलेल्या सेवेसाठी स्वतंत्र व्यक्‍ती पाठविली जाते आणि त्यांचा अर्ज स्वीकारण्यापासून त्यांना दाखले घरपोच देणे आणि मिळकतकर भरून त्याची पावती देण्याचे काम केले जाते. मात्र, या सेवेसाठी लावण्यात आलेले शुल्क जास्त असल्याने पुणेकरांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.

शुल्कामुळे फिरविली पाठ?
ज्या नागरिकांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना 87 रुपयांचे शुल्क निश्‍चित केले आहे. हे शुल्क जास्त असल्याने नागरिक योजनेकडे पाठ फिरवत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक शहराच्या कोणत्याही भागातून महापालिकेचे कर भरणा केंद्र अथवा जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी बसने गेले तरी एवढा खर्च येणार नाही. तसेच ऑनलाइन भरणा केल्यासही हा खर्च असणार नाही. मात्र, फक्‍त तंत्रज्ञान वापरता येत नाही आणि प्रकृतीमुळे पालिकेच्या कार्यालयात जाता येत नाही. इतक्‍याच कारणासाठी हे शुल्क भरण्यास नागरिक तयार होत आहेत. पण, हे शुल्क कमी केल्यास आणखी नागरिक सेवेचा लाभ घेतील, असे प्रशासनाचेच मत आहे.

घरपोच सेवेसाठी टोल-फ्री क्रमांक
1800-1032-222

87 रुपये शुल्क

अशी वापरता येते सेवा
ज्या नागरिकांना महापालिकेचा मिळकतकर, पाणीपट्टी ऑनलाइन, जन्म अथवा मृत्यु दाखला काढणे शक्‍य नाही, तसेच पालिकेतही त्यासाठी जाता येणार नाही. त्यांच्यासाठी पीएमसी केअर अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेने 1800-1032-222 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर फोन करून नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येतो. फोन केल्यानंतर आपल्याला हवी असलेली सेवा, त्यासाठीची सोयीची वेळ नागरिकांना द्यावी लागते. त्यानंतर संबधित नागरिकांकडे संस्थेकडून त्यांचा प्रतिनिधी पाठविला जातो. या योजनेची जनजाग़ृती करण्यासाठी महापालिकेने शहरातील तब्बल 7 लाख मिळकतधारकांना एसएमएस आणि इ-मेल द्वारे माहिती पाठविण्यात आली होती. मात्र, त्यातील केवळ 25 ते 30 जणांनीच त्याला प्रतिसाद देत या सेवांचा लाभ घेतल्याचे महापालिकेच्या संगणक आणि सांख्यिकी विभागाने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button