breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे

आपला मुख्यमंत्री करायचाच असा पक्का निर्धार शिवसेनेने केला असून भाजपाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपावर अनेक वार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तडजोड करीत पुन्हा भाजपाशी जुळवून घेतले होते. मात्र, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा युतीचा फॉर्म्युला, लोकसभा उपाध्यक्षपद आणि राम मंदिराचा मुद्दा यावरुन शिवसेनेची पुन्हा एकदा नाराजी दिसून आली आहे. त्यानंतर आजच्या अग्रलेखात तर थेट शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी पक्क्या निर्धाराने कामाला लागण्याचा संदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे.

गेल्या ५२-५३ वर्षात शिवसेना नावाचे वादळ महाराष्ट्रात घोंघावत आहे. सुरुवातीला जनतेच्या अनेक छोट्यामोठ्या आंदोलनांद्वारे सुरुवात झालेल्या शिवसेनेने नंतरच्या काळात इथल्या भुमिपुत्रांच्या न्याय हक्कांचा लढा दिला. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, पोटापाण्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंवर अनेक वाऱ आणि घाव झाले. आपल्याच माणसांच्या बाजूने उभे राहणे त्यांच्यासाठी गुन्हा ठरला. आता हीच शिवसेनेची भुमिपुत्रांची भुमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिथल्या भुमिपुत्रांसाठी लढत आहेत. इतकेच नव्हे दक्षिणेतील प्रत्येक राज्य प्रांतीक अस्तितेचे राजकारण करीत आहेत. राष्ट्रीय पक्षही प्रादेशिक पक्षाशी युत्या-आघाडय़ाकरून आपला आकडा वाढवीत आहेत. शिवसेनाप्रमुखांनीच हा प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला होता त्याला देशाने स्विकारले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे महत्व विषद केले आहे.

शिवसेनेचे हिंदुत्व हे केवळ सांस्कृतीक अंगाने जाणारे हिंदुत्व नव्हते, शिवसेनाप्रमुखांची भुमिका सर्वसमावेशक होती. प्रश्न केवळ धर्माचा नाही, देशात अनेक धर्म असून शकतील पण घटना आणि कायदे सर्वांसाठी एकच हवेत. आचारात-विचारात समानता हवी, अशी कायमच शिवसेनेची भुमिका राहिलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपत आहे, अशा शब्दांत वर्धापनदिनी आपली धर्मनिरपेक्ष भुमिका मांडण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button