breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘पीएमआरडीए’चा सर्वकष वाहतूक आराखडा तयार ; शहरालगतच्या 10 तालुक्यांचा समावेश

पीएमाआरडीएचे विवेक खरवडकर यांची माहिती 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे शहरा लगतचा वेगाने वाढणा-या उपनगरांचा पुढील २० वर्षांचा सर्वकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. शहरालगतच्या १० तालुक्यांचा यात समावेश केला आहे. प्रामुख्याने मेट्रो, रिंगरोड, बीआरटी मार्ग, बस टर्मिनल वर्तुळाकार रेल्वे आदी व्यवस्था उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अधिक्षक अभियंता रिनाज पठाण उपस्थित होत्या.

खरवडकर ते म्हणाले की,  सन २०३८ पर्यंत म्हणजे २० वर्षांचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात येत आहे. जानेवारी ते जून २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत एल अ‍ॅँण्ड टी कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून हा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. यासाठी या कंपनीला ३ कोटी रूपये देण्यात येणार आहे. त्यातील २० टक्के रक्कम (६० लाख रूपये) अदा करण्यात आली आहे. या सर्वांसाठी ५४ हजार ६०१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी १०० किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे,

पुणे महानगरपालिका हद्द (३३२ चौरस कि.मी. क्षेत्रफळ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द (२१० चौरस कि. मी. क्षेत्रफळ) असे एकूण ५४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा यामध्ये समावेश केला आहे, तर उर्वरित पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, पुणे शहर, हवेली, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर व वेल्हा आदी दहा तालुक्यांचा समावेश केला असून, एकूण २ हजार १७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळासाठी सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीत आराखड्याला मान्यता मिळाली आहे. तसेच दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारित करण्याची तरतुद करण्यात येणार आहे.  राज्यातील मुंबई नंतर सर्वात वेगाने विकसित होत असलेले शहर हे पुणे आहे. नवी मुंबई आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळामुळे पुण्याच्या विकासामध्ये मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचे नियोजन पीएमआरडीए करत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, रेल्वे विभाग, पुणे आणि ग्रामीण पोलीस, वाहतूक विभाग, तीन कॅन्टोमेंन्ट विभागाचे आधिकारी तसेच नगरपालिकांच्या मदतीने पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा यातून मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.

—————————
असा असेल वर्तुळाकार रेल्वे मार्ग
शंभर किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) मुळशी तालुक्यातील मळवली येथून सुरू होईल. हा मार्ग पुढे तळेगाव दाभाडे-भांबोली-वाकी बु.-चाकण-शेलपिंपळगाव-शिक्रापूर, घोलपवाडी-उरळगाव-मांडवगण फराटा-दौंड-पाटस-राजेवाडी (प्रस्तावित पुरंदर विमानतळ स्टेशन)-उरूळी कांचन-आळंदी म्हातोबाची-उंड्री-पिसोळी-कोंढवा-कात्रज-चांदणी चौक-बाणेर-पाषाण-वाकड-थेरगाव-देहूरोड-वडगाव मावळ आणि मळवली असा मार्ग राहणार आहे. 


सर्वकष वाहतूक आराखड्यामधील प्रस्तावित प्रकल्प 
१) १२५ किमी. ची मेट्रोलाईन तसेच ७० किमी. साठी Light Metro
२) २१० किमी. साठी BRT जाळे
३) १८ ठिकाणी दळणवळणाची बहुउद्देशीय स्थानके
४) विद्यमान उपनगरीय रेल्वे सेवेची क्षमता वाढवणे
५) PMR क्षेत्रातील १२८ किमी. चा रिंगरोड PMC मधील ३९ किमी.चा HCMTR व PCMC क्षेत्रातील – किमी चा
HCMTR
६) PMR क्षेत्रातील पुणे सातारा, पुणे नगर, पुणे सोलापूर, पुणे नाशिक राज्यमार्गांचे रुंदीकरण करणे.
७) प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी पोहोच रस्ते विकसित करणे.
८) PMC व PCMC हद्दीबाहेर ५ Inter State Bus Terminals (ISBT) उभारणे.
९) PMC व PCMC हद्दीबाहेर ६ औजड वाहतुकीसाठी ट्रक टर्मिनस उभारणे.
१०) वाहन मुक्त रस्ते, USDG प्रमाणे रुंद पदपथ, सायकल ट्रॅक, सुरक्षित पादचारी क्रोसिंग,व सक्षम सिग्नल यंत्रणा उभी
करणे.
११) वाहनतळाचे नियोजन करणे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button