breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाचे छापे, साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त

पिंपरी । प्रतिनिधी

सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सात ठिकाणी छापे मारून साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. यामध्ये दारुभट्टी, हॉटेल आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

चाकण-शिक्रापूर रोडवर हॉटेल साईमुद्रा व्हेज अँड नॉनव्हेज रेस्टोरंट रासे येथे निलेश बाळासाहेब पानसरे (वय ४३, रा. चाकण) याने गि-हाईकांना एकत्र जमवून दारू विक्री केली. शिक्षक, पदवीधर निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ड्राय डे घोषित केलेले असताना पानसरे याने दारूविक्री केली. तसेच पानसरे याच्याकडे दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना हॉटेलमधून त्याने देशी, विदेशी दारू, बिअर दारू विक्री केली. याबाबात माहिती मिळाल्याने पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून ४० हजार ९३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओटास्कीम, निगडी येथील दळवीनगर मध्ये बाबासाहेब सुभाष मांजरे (वय ३६) हा बेकायदा, बिगरपास दारू विक्री करीत होता. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून १२ इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की, ४३ टॅंगो पंच देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ३ हजार ९१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरगाव पोलिसांनी शिरगावात पवना नदीच्या कडेला सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी ६ लाख एक हजार रुपयांचे दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट केले. याबाबत रुपेश ईश्वर रजपूत (वय २५, रा. शिरगाव, कंजार, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलिसांनी देखील रहाटणी गावठाण येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून ६ हजार ८६० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. याबाबत बाळू वसंत म्हसकर (वय ३०, रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलिसांनी देशी-विदेशी दारू विक्री करणा-या एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. माया राकेश भाट (वय ३३, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. माया भाट ही इंदिरानगर येथील तुळजा भवानी मंदिराच्या समोर देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विकत होती. तिच्याकडून पोलिसांनी दीड हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे.

वाकड पोलिसांनी सुनीता संजय रावळकर (वय ३७, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव, वाकड) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला प्लास्टिकच्या कॅन मधून गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होती. तिच्याकडून ८०० रुपये किमतीची १० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

चिंचवड पोलिसांनी देखील गावठी हातभट्टीची दारू विक्री करणा-या एकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून १ हजार ६०० रुपयांची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. शंकर तिमाप्पा केंचमल (वय ३८, रा. भोईरनगर, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे.

सात ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तब्बल ६ लाख ५६ हजार ६०७ रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button