breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहराचे शांघाय कधी ? राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा भाजपला सवाल

पिंपरी – ‘ना भय ना भ्रष्टाचार’ पारदर्शक कारभाराची वल्गना करुन सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीने सव्वा वर्षात शहराचे वाटोळे केले आहे. गल्लीपासून दिल्ली पर्यंत भाजप सत्तेत असताना सव्वा वर्षांत शहरासाठी किती निधी आला, शहरात मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांचा दिवसाढवळ्या खून झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तर निवडणूक काळात पिंपरी चिंचवड शहराचे शांघाय करु म्हणणा-यांनी पुरती वाट लावल्याची टीका, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली. 
संजोग वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे पहिले महापाैर होण्याचा मान नितीन काळजे यांनी मिळविला.  त्यांच्या सव्वा वर्षातील कार्यकाळात तीस सर्वसाधारण सभेपैकी एकवीस सभा तहकूब  करण्याचा ‘विक्रम’ केला. यामुळे शहराच्या नावलौकीकात भर घालणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच ते म्हणाले की, शहर भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिका-यांना ‘टक्केवारीच्या’ राजकारणातच जास्त रस असल्याने सभा तहकूबीचा धडाका लावला आहे. परंतू, राष्ट्रवादीच्या काळात सर्वसाधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विरोध होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव सभा तहकूब करण्यात येत होती. परंतू, सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना शहराच्या प्रश्नाचे काही देणं-घेणं नाही. त्यामुळेच त्यांनी सभा तहकुबीचा सपाटा लावला होता.
शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्पासाठी भाजपने किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणा-या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरिकांना मिळाली पाहिजेत. राष्ट्रवादीच्या कार्यकालात शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात त्रेचाळीसाव्या क्रमांकावर गच्छंती झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button