breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महासभा : ‘निसर्ग’ चक्रीवादळावरुन नगरसेवकांचा प्रशासनाला ‘फटका’

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड आणि परिसरात निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याचे माहित असतानाही महापालिका आपत्ती विभाग, उद्यान विभाग, अग्निशामक विभागाची यंत्रणा पुर्णपणे तयार नव्हती. शहरातील विविध भागातील मुख्य रस्ते, घरांवर झाडे पडल्यानंतर ती त्वरीत हटविण्यात आली नाहीत, असा आक्षेप घेत नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला महासभेत घेरले.

तसेच, झोपडपट्टीच्या काही भागात पावसाचे पाणी शिरले. वीज पुरवठा खंडीत झाला. या आपत्तीच्या प्रसंगी अधिकारी फोन उचलत नव्हते, आयुक्तांचा प्रशासनावर वचक नसल्याने अधिकारी दाद देत नाहीत. अशा नाकर्त्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी महापालिका सभेत  केली. सभेत चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर तब्बल चार तास वादळी चर्चा झाली.

महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. सभेच्या सुरूवातीलाच  बुधवारी राज्यासह पिंपरी-चिंचवडवर आलेल्या निसर्ग चक्रीवादळावरील चर्चेला सुरूवात झाली. शहरात बुधवारी वारा आणि जोरदार पडलेल्या पावसामुळे विविध भागात दोनशेपेक्षा अधिक झाडे पडली. त्यामुळे काही घराचे, गाड्यांचे नुकसान झाले. कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. मात्र, काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते.

नगरसेविका झामाबाई बारणे म्हणाल्या, चक्रीवादळ येणार असल्याचे माहित असतानाही प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे. उद्यान अधिक्षक फोन उचलत नसून प्राधिकरण परिसरात आम्ही कार्यकर्त्यांसह रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावरील झाडे हटविल्याचे शारदा बाबर यांनी सांगितले.

स्थायी समितीचे सभापती संतोष लोढे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत  मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. पावसाळा सुरू होत असून शहराला दररोज पाणी पुरवठा देता येईल का? याचा विचार करावा.

यावर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाची आयुक्त हर्डीकर यांनी बैठक घेतली होती. त्यानंतरही अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा.

या विषयावरील चर्चेत नगरसेविका माई काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, विकास डोळस, उपमहापौर तुषार हिंगे, माजी पक्षनेते एकनाथ पवार, योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे आदींनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button