breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे ‘कमबॅक’; अण्णा बनसोडेंच्या रुपाने मिळाला आमदार!

शहरातील नवोदित कार्यकर्त्यांना उभारी मिळणार : संदीप पवार

भाजप-सेनेच्या वर्चस्वाला धक्का; मावळात भाजपचा दारुन पराभव

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी संपली…अशी वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीन पैकी एक विधानसभा मतदार संघ काबिज करुन राष्ट्रवादीने शानदार ‘कमबॅक’ केले असून, हा विजय म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे.

        शहरातील चिंचवड आणि भोसरी विधानसभा  मतदार संघ भाजपच्या ताब्यात होता. पिंपरी विधानसभेवर शिवसेनेचा कब्जा होता. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांना पराभव सहन करावा लागला.

        एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-सेनेते सुरूंग लावला होता. तीनपैकी एकाही मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले नव्‍हते. त्यातच महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे शहरातून राष्ट्रवादी संपली…अशी वल्गना भाजप-सेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली होती.

        आमदार अण्णा बनसोडेंच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहराला राष्ट्रवादीचा हक्काचा आमदार मिळाला आहे. जुने-जाणते नेते पक्षाला सोडून गेले. त्यामुळे पक्षाची शहरातील घडी विस्कळीत झाली होती. पण, आता बनसोडेंच्या मार्गदर्शनाखाली शहरात पक्षाचे संघटन वाढवण्यास मदत होईल, असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी व्यक्त केले.

नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे यांचा सत्कार शुक्रवारी युवा नेते संदीप पवार यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भांडवलकर, अमोल शेळके, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे शहराध्यक्ष वामनराव कदम, झो. सु. दलाचे पुणे जिल्हा अध्यक्षा सुनिता अडसुळे, वैशाली अवघडे, प्रमिला ठोंबरे, सुभाष गलांडे, चंद्रकांत कांबळे, अरुण अवघडे आदी उपस्थित होते.

पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या मतदार संघात २०१४ च्या निवडणुकीत अनुक्रमे गौतम चाबुकस्वार (शिवसेना), लक्ष्मण जगताप (भाजप), महेश लांडगे (सहयोगी सदस्य भाजप) व बाळा भेगडे (भाजप) विजयी झाले होते. राष्ट्रवादीला  एकही जागा मिळाली नव्‍हती. त्यानंतर तीन वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला प्रचंड अपयश आले होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मैदानात उतरवले होते. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मैदान मारले होते. परिणामी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे खचले होते. दरम्यान, मावळ विधानसभेत भाजपला चितपट करीत राष्ट्रवादीच्या सुनिल शेळके यांनी बाजी मारली. तसेच, पिंपरी विधानसभेत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेला आस्मान दाखवले. त्यामुळे  राष्ट्रवादीच्या कायकर्त्यांना उभारी मिळाली आहे, अशा भावना राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button