breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी न्यायालयात जाणार : तुषार कामठे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार पुराव्यासह निदर्शनास आणून दिल्यानंतरही आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. आयुक्तांसह या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आपण न्यायालयात दावा दाखल करणार असून महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी आपण यापुढे कार्यरत रहाणार असल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली.

महापालिकेतील भ्रष्टाचार, आयुक्तांकडून सुरू असलेला वेळकाढूपणा, कारवाई करण्याऐवजी अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, पैसे घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत असतानाही त्याकडे होणारे दूर्लक्ष या बाबींची माहिती देण्यासाठी कामठे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गेल्या दोन-तीन वर्षांत केलेल्या प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. दरनिश्चिती करताना एक रुपयांची वस्तू दहा रुपयांपर्यंत रिंग करून घेण्यात आली आहे. यानंतरही स्पेशिफिकेशन बदलून साहित्य घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार महापालिकेत झाला आहे. आम्ही केवळ दोनच प्रकरणे सध्या निदर्शनास आणली आहेत. यामध्ये पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून खात्यावर रक्कम घेतल्याचे निदर्शनास आणून देणे दिलेले असतानाही गेल्या १७ दिवसांपासून आम्ही कारवाईची मागणी करत असताना कोणतीही कारवाई आयुक्तांनी अद्यापपर्यंत केलेली नाही. हा अधिकाऱ्यांना वाचविण्याचा आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे.

जी प्रकरणे उजेडात आणली आहेत ते केवळ हिमनगाचे टोक आहे. पन्नास लाखांची वस्तू दीड कोटींना घेण्याचा प्रकार सुरू असतानाही आयुक्तांनी अद्यापपर्यंत ते टेंडर रद्द केलेले नाही. याशिवाय थ्री प्लाय सर्जिकल मास्क, थेट पद्धतीने पीपीई किट खरेदी, लॅब केमिकल, आयटीआयसाठी साहित्य खरेदी, आयसीयु युनिट, ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन, सोनोग्राफी युनिट, एमआरआयसाठी सिरिंज पंप खरेदी, एक्स रे मशीन दुरुस्ती यासह अनेक प्रकारच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

ज्या अधिकाऱ्यांबाबत आम्ही पुरावे सादर केले आहेत त्यांना वाचण्यासाठी एकप्रकारे संधी दिली जात आहे. उसणवारी व्यवहार, इसार पावती असे प्रकार करून खुलासे दिले जात आहेत. ही बाब अत्यंत निंदनिय आहे. शासनाच्या आदेशानुसार २५ हजारांपुढील उसनवारी अथवा खरेदी-विक्री, इसारपावती असे व्यवहार करताना पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. जुने स्टॅम्प गोळा करून त्यावर व्यवहार दाखविला जात आहे. हा प्रकार आयुक्त मान्यच करू शकत नाहीत. पुर्वपरवानगी न घेता अथवा पालिकेशी संबंधित ठेकेदाराशी असे व्यवहार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्याबाबत महाराष्ट्र सेवा वर्तणूक नियमावलीमध्ये स्पष्टपणे आदेशित केलेले आहे. त्यानंतरही आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना वाचविल्यास आयुक्तांविरोधात आम्हाला न्यायालयात जावे लागणार आहे. सर्व प्रकरणाचे पुरावे आम्ही एकत्र केले आहेत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करणे गरजेचे होते. तसेच चौकशी समितीची स्थापना करून आतापर्यंत चौकशी सुरू करणे अपेक्षित होते. मात्र यातील कोणतीही कारवाई आयुक्तांनी केलेली नाही. आयुक्त कोणाच्या दबावाखाली वावरत आहेत. आयुक्त जर चुकीच्या अधिकाऱ्यांना आणि कामांना पाठबळ देणार असतील तर न्यायालयात जाण्याशिवाय आमच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही. आयुक्तांनी सात दिवसांत कारवाई न केल्यास सर्व पुराव्यानिशी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही कामठे यावेळी म्हणाले.

आमच्या मागण्या

पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करणे

गेल्या तीन वर्षांत केलेल्या प्रत्येक खरेदीची चौकशी करणे वरील कालावधीत घेतलेल्या प्रत्येक मशीनचे स्पेशिफिकेशन तपासणे

चिनी साहित्य महापालिका स्विकारणार नाही, असा आदेश असतानाही कोट्यवधी रुपयांचे चिनी साहित्य का स्विकारले? त्या ठेकेदाराकडून संबंधित रक्कम वसूल करून ज्या अधिकाऱ्यांनी हे साहित्य स्विकारण्यास मान्यता दिली त्यांच्यावर कारवाई करणे

दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चाची तपासणी करून अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करणे चुकीची कामे केलेल्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणे

या ठेकेदारांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई सुरू करणे

या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे करोना कालावधीत केलेल्या प्रत्येक खरेदीची चौकशी करणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button