breaking-newsताज्या घडामोडी

पाच राज्यातील भाजपचा पराभव म्हणजे जनतेचा ‘हुकूमशाहीला’ गर्भित इशाराच

  • पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचा जल्लोष
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पेढे वाटप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालात भाजपाची पिछेहाट म्हणजे जनतेने ‘हुकूमशाहीला’ दिलेला गर्भित इशारा आहे, अशी टिका पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणूकांचा निकाल मंगळवारी (दि. 11 डिसेंबर) जाहिर झाला. यामध्ये कॉंग्रेसला लक्षणिय यश मिळाले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांनी पिंपरीत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.

साठे म्हणाले की, या पाचही राज्यातील जनतेने भाजपाला नाकारले आहे. मागील साडेचार वर्षात प्रधानसेवक म्हणवून घेणा-या पंतप्रधानांची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु झाली होती. पक्षातील वरिष्ठांसह विरोधी पक्षांना देखील अपमानास्पद वागणूक देण्याचे मोदींचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यांच्या एककल्ली व हुकूमशाही राजवटीला कंटाळून कालच रिजर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांनी आणि आज उपगर्व्हनरांनी राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना देखील माध्यमांसमोर येऊन गा-हाणे मांडण्याची वेळ देशाच्या इतिहासात प्रथमच घडली.

नोटबंदीने बेरोजगारी वाढविली

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी 1991 साली केलेल्या ‘गॅट’ करारानुसार देशाची अर्थव्यवस्था महासत्तेकडे वाटचाल करीत असताना मोदींनी दोन वर्षांपुर्वी उत्तर प्रदेशातील निवडणूकीमध्ये विरोधकांना त्रास देण्याच्या उद्देशाने देशातील 125 कोटी जनता, केंद्रिय मंत्रीमंडळ, रिझर्व्ह बॅंक आणि आरबीआयच्या गर्व्हनरांना देखील अंधारात ठेवून नोटाबंदीची घोषणा करुन ताबडतोब अंमलबजावणी केली. यामुळे देशभर अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. नोटा बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत अनेकांना जीव गमवावा लागला. देशातील छोटे, मोठे, उद्योजक, व्यापारी, कामगार, शेतकरी, गृहिणी महागाईने त्रस्त झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करु असे सांगणा-या मोदींनी नोटाबंदी केल्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली, असे साठे म्हणाले.

नागरिकांना जगणे मुश्किल केले

सर्व समान्य जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होण्याएैवजी आहे तीच खात्यातील शिल्लक, जीएसटी व इतर करांच्या नावाखाली बँका कापू लागल्यामुळे जनतेच्या पैशांवर सरकारचा डोळा आहे हे लक्षात आले. हजारो कोटींचे कर्ज घेऊन मोदी, मल्ल्या परदेशात पळाले, हजारों कोटींचे उद्योगपतींचे कर्ज माफ करणा-या सरकारकडे शेतक-यांना, उच्च शिक्षण घेणा-या मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदान देण्यासाठी पैसा नाही. मोदींनी सत्तेत येताच पॅनकार्ड, आधारकार्ड शिवाय नागरीकांचे जगणे मुश्किल केले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही त्यांच्या डोळ्यावरील सत्तेची धुंदी उतरली नाही. भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीला देशातील पाचही राज्यातील जनतेने नाकारले आहे, असेही साठे यावेळी म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button