breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पाच दिवस उष्णतेचा कहर..

तीव्र उष्म्यामुळे तापलेल्या महाराष्ट्रामध्ये सध्या पूर्वमोसमी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून येत्या पाच दिवसांत राज्यात काही ठिकाणी उष्ण लहरींचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली असून, राजस्थानच्या चुरू शहरात शनिवारी पाऱ्याने ५० अंशांचा आकडा ओलांडला. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा बरेच वर गेले असून, पुढील आठवडय़ापर्यंत या परिस्थितीतून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. नागपूरमध्ये शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने त्रेधा उडवली.  सध्या काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भ, कोकण विभागासह काही ठिकाणी वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाडय़ातील लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ आदी काही जिल्ह्य़ांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होणार असून, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने मोसमी पावसाच्या आगमानाला विलंब होणार असल्याचे म्हटले आहे. केरळमध्ये पाऊस ७ जून रोजी येणार असल्याचा सुधारित अंदाज आहे.

७५० कोंबडय़ांचा मृत्यू

वाडा : अति उष्णतेमुळे विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथील दोन पोल्ट्री फार्ममधील साडेसातशेहून अधिक कोंबडय़ांचा मृत्यू झाला. पारा ४२ अंशांवर पोचल्यामुळे कुर्झे येथील मिलिंद गायकवाड यांच्या पोल्ट्रीत शुक्रवारी एकाच दिवशी ६७२ कोंबडय़ांचा, तर भरत शेलार यांच्या पोल्ट्रीतील २३७ कोंबडय़ांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने पोल्ट्रीतील पंखे बंद पडले. पोल्ट्रीत थंडावा निर्माण करण्यासाठी विजेअभावी पाण्याचा फवाराही मारता आला नाही. उष्णता असह्य़ झाल्याने कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याचे मिलिंद गायकवाड यांनी सांगितले.

तापभान.. कोकण विभागातील मुंबई, अलिबाग, रत्नागिरी आदी ठिकाणचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी अद्यापही कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. शनिवारी वर्धा येथे सर्वाधिक ४५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भात इतर ठिकाणी कमाल तापमान ४१ ते ४४ अंशांदरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मालेगाव वगळता सध्या सर्वच ठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button