breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त ‘सायकल बस’

प्रदूषणाची समस्या भेडसावत असताना हा प्रश्न काही अंशी कमी करण्याच्या उद्देशातून पर्यावरणपूरक ‘सायकल बस’ची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य पुण्यातील मिलिंद कुलकर्णी यांनी पेलले आहे. प्रायोगिक तत्त्वावर साकारलेल्या या सायकल बसमधून एका वेळी नऊ जण प्रवास करू शकतात.

या नावीन्यपूर्ण सायकल बसमधून एका वेळी नऊ जण प्रवास करू शकतात. त्याची रचना आणि बांधणी वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. स्टिअिरग व्हील, क्लच आणि ब्रेक एवढय़ा तीन गोष्टी चालकाने सांभाळायच्या, तर उर्वरित आठ जणांनी पायडल मारून सायकल चालवायची.

आठ जणांनी पायडल मारून निर्माण होणारी  शक्ती अ‍ॅक्सलला मिळते. या अ‍ॅक्सलपासून मागच्या चाकांना शक्ती दिली जाते. १३ फूट लांबीची आणि पाच फूट रुंदीची असलेली ही सायकल बस करण्यासाठी सव्वा लाख रुपयांचा खर्च आला. पाच दिवसांपूर्वी गांधी भवन परिसरातील मोकळ्या मैदानामध्ये सायकल बसची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

या सायकल बसची वैशिष्टय़े सांगताना कुलकर्णी म्हणाले, सायकल चालवताना म्हणजेच पायडल चालकाला तोल सांभाळावा लागतो. ते काम येथे पायडल मारणाऱ्या लोकांना करावे लागत नाही.

चालकाने बसचे नियंत्रण करायचे आणि आठ जणांनी सुरक्षितपणे पायडल मारत प्रवास करायचा आहे. संगीतातील समूहगान प्रकाराप्रमाणे सर्वाना एकत्रितपणे आणि सुरक्षितपणे सायकल चालविण्याचा आनंद लुटता येतो. पर्यावरणपूरक सायकल बसमुळे प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवत नाही. या सायकल बसला इलेक्ट्रीक पॉवर देऊन बॅटरी वाहन करता येऊ शकेल. त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

बालपणी मासिकामध्ये वाचलेली गोष्ट या माध्यमातून प्रत्यक्षात साकारता आली याचे समाधान आहे. १५ वर्षांपूर्वी मी जर्मनीला गेलो होतो. तेथे पाहिलेली सायकल बस आपण भारतामध्ये का करू नये अशा इच्छेतून मी या सायकल बसची निर्मिती केली आहे.

मी सुरुवातीला सोलर सिस्टिम्स क्षेत्रात काम केले. पण, नावीन्याचा शोध घेण्याची ओढ काही मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे संशोधन आणि विकास हेच माझ्या कामाचे स्वरूप झाले. नावीन्यपूर्ण उत्पादनासाठी वेगवेगळी सहा स्वामित्व हक्क (पेटंट) मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी एका उत्पादनामध्ये स्वामित्व हक्क मंजूर झाला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

बहुमजली इमारतींमधील घरांसाठी भिंतीवरच्या सौर कुकरची (वॉलमाऊंटेड सोलर कुकर) निर्मिती केली असून आतापर्यंत २५ सोलर कुकरची विक्री केली आहे. तीन डब्यांच्या या कुकरमधून चार-पाचजणांच्या कुटुंबाचे अन्नपदार्थ शिजवता येतात, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button