breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पद्मनाथस्वामी मंदिरतील १० पुजाऱ्यांना कोरोनाची लागण, दर्शनासाठी मंदिर पुन्हा बंद

तिरुवनंतपुरम – अनलॉकच्या प्रक्रियेत देशभरातील अनेक मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे केरळच्या तिरवनंतपुरमच्या पद्मनाथस्वामी मंदिरही सुरू करण्यात आले होते. मात्र, या मंदिरातील तब्बल १० पुजारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे मंदिर पुन्हा १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे दोन मुख्य पुजारी, आठ सहकारी पुजारी आणि दोन गार्ड कोविड १९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंदिरात भाविकांसाठी दर्शनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भाविकांना मंदिरात दाखल होण्यास परवानगी नसली तरी मंदिरातील दररोजची पूजा मात्र नित्यनेमाने सुरूच राहील.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये देशातील सर्व धार्मिक स्थळं बंद करण्यात आली होती. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात काही अटी आणि नियमांसहीत मंदिरं उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पद्मनाथस्वामी मंदिरही २६ ऑगस्टपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोविड १९ चे कडक नियम लागू करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांना एक दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. तसंच दर्शनासाठी येताना आधार कार्ड आणि ऑनलाईन बुकिंगची एक प्रत सोबत बाळगण्यास सांगण्यात आलं होतं. तसंच मंदिराकडून एक निवेदन जाहीर करून सकाळी ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत ते सायंकाळी ५.०० ते ६.४५ पर्यंत दर्शन सुरु राहील, अशीही माहिती देण्यात आली होती.

एका वेळी केवळ ३५ भाविकांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. तसंच एका दिवसात केवळ ६६५ भाविकांना दर्शन करता येत होतं. भाविकांना मास्क परिधान करणे, साबणानं हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात देशभरात आणखीही काही मंदिरं भाविकांसाठी उघडण्याची तयारी सुरू आहे. दिल्लीचं भव्य स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरही १३ ऑक्टोबरपासून उघडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. इथेही सीमित संख्येलाच दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. याशिवाय वृंदावनचं प्रसिद्ध बांकेबिहारी मंदिरही १७ ऑक्टोबरपासून नियमित दर्शनासाठी उघडलं जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button