breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांच्याकडून स्वागत, मोदींनी घेतला लसीच्या प्रगतीचा आढावा

पुणे / महाईन्यूज

कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) भेट दिली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब हात जोडून मोदींचं स्वागत केलं. विशेष म्हणजे यावेळी आदर पुनावाला यांचा शालेय वयातील मुलगा देखील उपस्थित होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली.

देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याची प्रगतीपर माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर 2020) देशातील तीन शहरांचा दौरा केला. सुरुवातील मोदींनी अहमदाबाद, नंतर हैदराबाद आणि शेवटी पुण्यातील कोरोना लस उत्पादनाचा आढावा घेतला. या तिन्ही ठिकाणी कोरोना लसीच्या निर्मितीचे काम सुरु आहे. त्यानुसार मोदींनी कोरोना लसीच्या संपूर्ण कामाचा आढावा घेत ही लस कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील संशोधकांशीही चर्चा केली. तसेच या लस निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली. मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेही उपस्थित नव्हते.

पंतप्रधान मोदी यांचे वायुसेनेच्या विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. येथे ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमांडर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मोदींचे स्वागत केले.

सीरम इन्स्टिट्यूट नेमके काय आहे?

सायरस पुनावाला यांनी 1966 मध्ये पुण्यातील हडपसर भागात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरु झाला.

आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती करण्यात आली आहे. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर उपयोग होणाऱ्या लसींपैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्यासोबत करार केला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button