breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नाटय़गृहातील मोबाइलबंदीसाठी कलाकारांचा पुढाकार

नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच खणखणणाऱ्या मोबाइलच्या घंटीमुळे होणारा रसभंग नाटय़ कलाकारांनाही अस्वस्थ करू लागला आहे. नाटय़गृहात मोबाइल बंद वा ‘मौनस्थिती’त (सायलेंट) ठेवण्यासंदर्भात वारंवार सूचना व आवाहने करूनही प्रेक्षकांत सुधारणा होत नसल्याने सोमवारी अभिनेता सुबोध भावे याने बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मोबाइलची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर नाटय़गृहानेही मोबाइल बंद केल्याखेरीज प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुमित राघवन याने नाटय़गृहात प्रयोगांदरम्यान वाजणाऱ्या मोबाइलबद्दल समाजमाध्यमावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक सर्वसामान्य नाटय़रसिकांनीही त्याच्या या नाराजीचे समर्थन केले. परंतु रविवारी अभिनेता सुबोध भावे याच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटय़प्रयोगादरम्यान मोबाइल वाजणे सुरू होते. त्यावर चिडलेल्या सुबोधने ‘अनेक वेळा विनंती करूनही जर नाटक सुरू असताना मोबाइल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काही तरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊ न बघण्याची गरज वाटत नाही,’ असे सांगत यापुढे असा प्रकार घडल्यास नाटय़प्रयोग न करण्याचा इशारा सुबोधने दिला होता.

त्यानुसार सोमवारी प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारावर उभा राहून तो स्वत: प्रेक्षकांचे मोबाइल ‘मौनस्थिती’त आहेत का, हे तपासत होता.

‘कोणतीही कला सादर करताना तो कलाकार तन्मयतेने त्याच्याशी एकरूप झालेला असतो. अशा वेळी जर फोन वाजले तर संपूर्ण कलाकृतीचा रसभंग होतो. आपण घरात टीव्ही पाहतानाही मध्ये कुणी बोललेले आपल्याला आवडत नाही. मग हे तर नाटक आहे.

प्रत्येक प्रेक्षक असा नाही; परंतु शंभरात जो एक आहे त्यामुळे संपूर्ण प्रयोगाचा अपमान होतो. २००४ सालीदेखील मी अशीच भूमिका घेतली होती. आज पंधरा वर्षांनीही हेच सांगावे लागते याचे दु:ख वाटते,’ अशी प्रतिक्रिया सुबोध भावे याने दिली.

केवळ मीच नव्हे, तर शरद पोंक्षे, जितेंद्र जोशी आणि अनेक कलावंतांनी याविषयी भूमिका मांडली आहे. तुम्ही एखादी गोष्ट मांडताना कु णी तुम्हाला विचलित केले तर तुमचा जसा संताप होतो तसाच तो कलाकारांचाही होणार. स्वयंशिस्त कुठे तरी कमी पडते, असे दिसते.

– शुभांगी गोखले, अभिनेत्री

प्रेक्षकांना समजावून झाले आहे. तरीही सुधारणा होत नाही; म्हणून शाळा, रुग्णालये, शासकीय कार्यालयांमध्ये ज्याप्रमाणे सूचना फलक असतात तशाच सूचना आता नाटकांच्या तिकिटांवर छापण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.  यातून काही तरी सकारात्मक बदल घडेल अशी आशा आहे.

– राहुल भंडारे, नाटय़निर्माता

कृपया आपला फोन सायलेंट मोडवर ठेवा, अशी जाहीर सूचना मी स्वत:च देतो.  याउपरही जर असा प्रकार नाटय़गृहात घडला तर प्रयोग थांबवून त्या व्यक्तीला नाटय़गृहाबाहेर जाण्याची विनंती मी करणार आहे. ती व्यक्ती नाटय़गृहाबाहेर गेल्याशिवाय मी प्रयोग सुरू करणार नाही.  कलाकारांप्रमाणे प्रेक्षकांनाही शिस्त हवीच.

– सुमित राघवन, अभिनेता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button