breaking-newsमहाराष्ट्र

नाटकांना सुगीचे दिवस (अग्रलेख)

मराठी साहित्य हे भारतीय साहित्य परंपरेमधले एक मानाचे पान असून, त्याचेच उपांग असलेले मराठी नाट्यविश्‍व फार मोठी परंपरा असलेले एक अभिजात क्षेत्र आहे. साहित्य आणि नाट्य शाखांचे अखिल भारतीय स्तरावरचे दरवर्षीचे संमेलन हा मराठी संस्कृतीचा मान बिंदू समजला जातो. आजवरच्या सुमारे 125 वर्षांच्या इतिहासात साहित्य संमेलने 91 झाली असली, तरी नाट्य संमेलने 98 झाली असून लवकरच नाट्य संमेलनांची शताब्दी होणार आहे. याच नाट्य संमेलनाच्या देदीप्यमान परंपरेमधले 98 वे संमेलन सध्या मुलुंड (ठाणे) येथे सुरू असून तब्बल 25 वर्षांच्या अंतराने मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांना हा मान मिळाला आहे. आपल्या जीवनाची तब्बल 50 वर्षे ज्यांनी नाट्यसेवेला दिली, त्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्यगीत गायिका कीर्ती शिलेदार या सदर संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत.

संगीत नाटक ही महाराष्ट्राची अभिजात कला आहे. कलेत मिसळ असली की कला संपते. अभिजात कला संपत नाही. एखाद्या रसिकाने त्याविषयी आस्था दाखवली की ती कला पुन्हा नव्याने जीवित होते. संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने वाढू लागेल असा विश्वास वाटतो. नवे विचार तरुण लोक आज करत आहेत. नव्या विचाराने संगीत नाटक सादर होत आहे. जुन्याचं जतन व्हायला हवं. कारण त्यात अनेक चांगले ताल आहेत, रचना आहे, गायकी आहे. त्यामुळे संगीत नाटक व्हायला हवं.

या सर्व पार्श्‍वभूमीचा विचार केला, तर ज्या संगीत नाटक परंपरेचे एक पर्व साठ-सत्तरच्या दशकात मराठीमध्ये होते, त्या संगीत नाटकांची आजची अवस्था काय आहे? कोणीही चटकन, “आता कोण पाहातो हो, संगीत नाटके? आजकाल संगीत नाटके निर्माण तरी होतात का?’ काही अंशी आणि प्रथमदर्शनी सत्य वाटावी, विश्‍वास बसावी अशी ही स्थिती आहे, हे मान्य करायला हवे. अण्णासाहेब किर्लोस्करांनी समाजातील विविध स्तरांततील तीनही वर्गांना एका छताखाली एकत्र आणलं. या वर्गांचं एकत्रित मनोरंजन करण्यासाठी “संगीत नाटक’ हा कलाप्रकार रूढ केला. सर्व प्रकारचे संगीत नाटकात ऐकायला मिळू लागलं. अनेक थोर कलाकार घडले ते याच काळात. थोर नाटककारांनी अप्रतिम नाटकं लिहिली. आणि संगीतकारांनी वेगवेगळ्या संगीत प्रकारांचा उपयोग करून मराठी रसिक मनाला संगीताची जाणकारी बहाल केली. नाटकमंडळांच्या शिस्तीत संगीत नाटक बहरलं. संगीत नाटकांची लोकप्रियता कळसाला पोहोचली.

अण्णासाहेब किर्लोस्कर आणि गोविंद बल्लाळ देवल या गुरुशिष्यांनी खऱ्या अर्थानं संगीत नाटक’ सिद्ध केलं. त्यानंतर बोलपटांचं आक्रमण झालं आणि क्रमाक्रमाने गद्य, सामाजिक नाटके येत राहिली. आजच्या काळाचा विचार करायचा झाला तर मल्टिप्लेक्‍स मनोरंजन, व्हीएफएक्‍स इफेक्‍टससारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट आणि सोशल मीडियाचे आक्रमण या सगळ्या जंजाळात भरजरी परंपरा ल्यालेलं हे मानाचं पान काहीसं काळवंडल्यासारखं झालं होतं. मात्र, या सोनेरी परंपरेकडे काही वर्षांपूर्वी आलेल्या “कट्यार काळजात घुसली…’ या गाजलेल्या नाटकाचे सिनेमामध्ये झालेले माध्यमांतर भलतेच गाजले आणि दर्जेदार संगीत, उत्तम कथावस्तू, आशयपूर्ण संवाद आणि अस्सल महाराष्ट्रीयन परंपरेचे सम्यक दर्शन, यामुळे संगीत नाटक या संकल्पनेकडे आजच्या पिढीचे लक्ष वेधले गेले. राज्यात सर्वत्र होत असलेल्या विविध नाट्य आणि एकांकिका स्पर्धा, महोत्सवांतून तुरळक हजेरी लावणारी संगीत नाटके आता “कट्यार…’ च्या यशानंतर वाढू लागली आहेत, हे नि:संशय! “संगीत देवबाभळी’ सारखे नाटक आज महाराष्ट्रातील सर्वात हिट नाटकांमध्ये गणले जात असून, त्याला लोकमान्यतेसह राजमान्यताही मिळते आहे.

मराठी नाट्यवर्तुळात सध्या सतत चर्चेत असलेले ‘संगीत देवबाभळी’च आहे. गुंतवून ठेवणारे कथानक, संवादांना मिळणारी रसिकांची दाद, संत तुकाराम महाराजांच्या काळात नेणारे नेपथ्य आणि संगीत ही या नाटकाची वैशिष्ट्‌ये आहेत. या सर्वच आश्‍वासक पार्श्‍वभूमीवर संमेलनाध्यक्ष असलेल्या कीर्ती शिलेदार यांनी म्हटले आहे की, “संगीत नाटक ही महाराष्ट्राची अभिजात कला आहे. कलेत मिसळ असली की कला संपते. अभिजात कला संपत नाही. एखाद्या रसिकाने त्याविषयी आस्था दाखवली की ती कला पुन्हा नव्याने जीवित होते. संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने वाढू लागेल असा विश्वास वाटतो. नवे विचार तरुण लोक आज करत आहेत. नव्या विचाराने संगीत नाटक सादर होत आहे. जुन्याचं जतन व्हायला हवं, कारण त्यात अनेक चांगले ताल आहेत, रचना आहे, गायकी आहे. त्यामुळे संगीत नाटक व्हायला हवं. परंपरा म्हणून त्याचा अभ्यासही व्हायला हवा, असं वाटतं.’ संगीत नाटकाला आपला ध्यास, श्वास मानून कीर्ती शिलेदार यांनी गेली 50 वर्षें संगीत रंगभूमीची अविरत सेवा केली आहे.

संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने बहरून येईल हा त्यांचा विश्वास खरा ठरावा आणि संगीत रंगभूमीला पुन्हा सोन्याचे दिवस यावेत, ही त्यांची सदिच्च्छा म्हणजे प्रत्येकच नाट्यप्रेमीच्या मनातली भावना आहे. त्या म्हणतात, “रंगभूमीवर जे जे सुंदर आहे, ते ते टिपा. केवळ संगीत रंगभूमीच नव्हे; तर संपूर्ण रंगभूमी कशी आहे, हे प्रत्यक्ष अनुभवा. जन्माच्या आधीपासून आजतागायत मला या रंगभूमीबरोबर आयुष्याची वाटचाल करता आली, नव्हे मला जणू जन्मसिद्ध अधिकारच मिळाला, ही परमेश्वराची कृपा. गावोगावी फिरणाऱ्या, बिऱ्हाड स्वरूपाच्या नाटक मंडळ्यांमधली अखेरची अशी “मराठी रंगभूमी’ ही संगीत नाट्यसंस्था आहे. संगीत नाटक हा महाराष्ट्राच्या मातीतला अभिजात कलाप्रकार. वारकरी संप्रदायामुळे भजन, कीर्तन, ओव्या, भारूड यातून बहुजन समाज समृद्ध झाला. लोकसंगीत, तमाशा, पोवाडा, गवळण, लावणी यांनी रसिक घडत गेले. शास्त्रीय संगीताची गंगोत्री महाराष्ट्रात आल्यावर रागदारी संगीताची आराधना महाराष्ट्रानं मन:पूर्वक जपली. आमचा महाराष्ट्र संगीतवेडा आहे, तसाच नाटकवेडा आहे. त्याचं हे नाट्यवेड जपणारा असा नाट्यमहोत्सव शताब्दीनंतरही असाच “वेलू गगनावरी…’ जावा तसा जात राहो, हीच यानिमित्ताने सदिच्छा!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button