breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांनी सक्षमतेने आपल्या आरोग्याची आणि शहराची काळजी घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षमतेने काम करीत असून नागरिकांनी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तेवढ्याच सक्षमतेने आपल्या आरोग्याची आणि आपल्या शहराची काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कामकाजाची आणि विविध यंत्रणेची माहिती आज खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कोरोना विषाणू नियंत्रण कक्षा अंतर्गत स्वतंत्र वॉर रुम तयार करण्यात आली आहे. या वॉर रुमची पाहणी करुन खासदार बारणे यांनी संपुर्ण कामकाजाची माहिती घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे वॉर रुमचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याची माहिती दिली. यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण , अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावशाली यंत्रणा तत्परतेने कार्यान्वित केली. त्यामुळे कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यात यश येत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

महापालिकेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम राबवून कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला. त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करुन युध्द पातळीवर कामकाज सुरु केले. या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन खासदार बारणे म्हणाले, महापालिकेच्या वतीने नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांचे सहकार्य या दृष्टीकोनातून अपेक्षित असून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याची महत्वाची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. महापालिकेचे सर्व डॉक्टर व कर्मचारी स्वत : चा जीव धोक्यात घालून काम करीत असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. नागरिकांनी देखील सजग राहून सक्षमतेने आपल्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारे गर्दी करुन आपला जीव धोक्यात घालू नये ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

महापौर उषा ढोरे यांच्यासह सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन, वैद्यकिय विभागातील अधिकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी या आपतकालीन परिस्थितीमध्ये अहोरात्र मेहनत घेवून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. नागरिकांनी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तेवढ्याच सक्षमतेने आपल्या आरोग्याची आणि आपल्या शहराची काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button