breaking-newsपिंपरी / चिंचवड

नगरसेवक सचिन चिखलेंच्या पाठपुराव्यामुळे परप्रांतीयांसह राज्यातील नागरिक पोहोचले स्वगृही

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गेल्या ४५ दिवसांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. यामुळे हजारो कामगार, विद्यार्थी, पर्यटक शहरात अडकून पडले आहेत. त्याचबरोबर परप्रांतीय कामगार पायी चालत निघाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातदेखील हीच परिस्थिती आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बाहेरच्या राज्यासकट महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात अडकले आहेत. अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, गावी जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे या नागरिकांना शहरात अडकून पडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.   

प्रभाग १३, निगडी-यमुनानगर परिसरात या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी मूळगावी जाण्याची इच्छा असणाऱ्या परप्रांतीयांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची यादी बनविण्याचे काम स्थानिक नगरसेवक सचिन चिखले यांनी निगडी पोलिस ठाण्यातील प्रशासनासोबत केले. त्या अनुषंगाने आतापर्यंत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील ५८० नागरिकांपैकी ५०० लोक आप-आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष तथा मनसे गटनेता सचिन चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात चिखले यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे व लॉकडाऊनमुळे बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी पिंपरी चिंचवड शहरात अडकून पडले आहेत. त्यातील अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे हे नागरिक शहरात अडकले आहेत. तसेच शहरातील प्रभाग १३ निगडी-यमुनानगरमधील हजारो स्थलांतरित नागरिक निवारा केंद्रात दाखल झाले होते. आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या. असा तगादा त्यांनी लावला होता. यामध्ये राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ, आंध्रप्रदेश, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंडसह राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापुर, नांदेड, जालना, वाशिम, यवतमाळ, सोलापुर, हिंगोली, गोंदिया, उस्मनाबाद, मुंबई, कोकण, जालना, औरंगाबाद, अ. नगर या जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश होता, असेही चिखले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या आंतरराज्य व आंतरजिल्ह्यातील कामगार, मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी यांची निगडी पोलिसांच्या मदतीने गेली पाच दिवस माहिती संकलित करण्याचे काम केले. या सर्व नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी पासची कार्यवाही युद्धपातळीवर करून, त्यांना खासगी बसेस तसेच संत तुकाराम नगर डेपो, निगडी आणि भोसरी डेपोमधून गावी जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या. मूळ गावी जाणारे कामगार पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत राहतात. काही कामगारांना पोलिस ठाण्यासमोर जमण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना सुरक्षित वावराचा अवलंब करून पुण्यात रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी बसच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी पोलिसांकडून मिळाली. फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. तसेच सनिटायझरसह सुरक्षा साधनांचा वापर करून खबरदारी घ्या, असेही बजावले. आतापर्यंत ५८० नागरिकांपैकी ५०० नागरिक आप-आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. उर्वरित लोकांनाही लवकरच त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यात येणार आहे, असेही चिखले यांनी म्हटले आहे.

या मदतकार्यात निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, लक्ष्मण सोनवणे, केरबा माखणे, श्रावण गोयल, जोसना रामपाल,  तसेच डॉ. पाचपांडे, डॉ. करडे, डॉ. नितीन जाधव, डॉ. लबडे यांनी सर्व नागरीकांची आरोग्य तपासणीची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली. सचिन चिखले मित्र परिवार, कार्यकर्ते व आदींनी परिश्रम घेतले, असे या पत्रकात सचिन चिखले यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button