breaking-newsमहाराष्ट्र

धनगर समाजाचेही आंदोलनाचे हत्यार

  • आजपासून रस्त्यावर उतरणार : पुण्यातील बैठकीतील निर्णय

पुणे – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वातावरण तापले असताना आता धनगर समाजानेसुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. दि. 1 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

धनगर समाज आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील समाजनेत्यांची मंगळवारी पुण्यात बैठक झाली. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार राम वडकुते, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

“धनगड’ ऐवजी “धनगर’ अशी दुरुस्ती करण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, कोणीही न्याय दिला नाही. विद्यमान सरकारने आरक्षणाचे आश्‍वासन देऊन गेली चार वर्षे फक्त वेळकाढूपणा केल्याचा आरोप यावेळी शेंडगे यांनी केला. सरकारने धनगरांची फसवणूक केल्याने आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसून 1 ऑगस्टपासून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

“धनगड’ आणि “धनगर’ एकच असल्याचे अनेक पुरावे केंद्र व राज्य सरकारला देण्यात आले आहेत. केंद्राला हे मान्य आहे, पण राज्य सरकारला मान्य नाही. धनगर समाजाच्या स्थितीवर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे सरकरला आरक्षणासाठी वेळ देण्यास आता धनगर समाज तयार नाही, असेही यावेळी प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले.

“धनगर’ समाजाचा उल्लेख “धनगड’ झाल्याने राज्यातील धनगर समाज एसटी प्रवर्गाच्या आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षणासाठी सर्व पुरावे देण्यात आले. तर, सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले. आतापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त बैठका झाल्या, परंतु, काहीच निर्णय झालेला नाही, असेही शेंडगे म्हणाले.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button